मुंबई : वरळीच्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता त्यांच्या हक्काच्या घरांचा ताबा घेण्यासाठी मे महिन्याची वाट बघावी लागणार आहे. आधी मार्चमध्ये ताबा दिला जाईल असे म्हाडाकडून सांगण्यात येत होते. त्यानंतर एप्रिलची मुदत देण्यात आली होती. मात्र आता एप्रिल संपत आला तरी घरांची किरकोळ कामे संपलेली नाहीत. त्यामुळे मेशिवाय रहिवाशांना तेथे प्रवेश मिळणे शक्य नाही.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टॉवरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यात 8 इमारती तयार असून त्यापैकी 2 इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही इमारतींमधील घरांचा ताबा 556 कुटुंबांना दिला जाणार आहे. अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र या इमारतींना प्राप्त झाले नसल्याने एप्रिलमध्ये ताबा दिला जाईल असे मार्चमध्ये सांगण्यात आले होते. मात्र एप्रिलमध्येही रहिवाशांना ताबा मिळू शकला नाही.