अखेर नव्या घराच्या चाव्या हाती पडल्या Pudhari File Photo
मुंबई

BDD chawl housing project : अखेर नव्या घराच्या चाव्या हाती पडल्या

बीडीडी चाळकर्‍यांच्या प्रत्यक्ष चावी वाटपाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : साधारण 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या नव्या घराच्या चाव्या मिळण्यास सुरुवात झाली आहे. बजरंग काळे, देवानंद दिक्का यांनी सर्वप्रथम आपल्या नव्या घराचे दार उघडले.

वरळी बीडीडी चाळ परिसरातील सुमेर केंद्र येथे चावी वाटपाचे काम सुरू आहे. खरेतर सोमवारपासूनच चावी वाटपाला सुरुवात झाली आहे. मात्र दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्वांनाच चाव्या मिळू शकल्या नव्हत्या.

सोमवारी केवळ बजरंग काळे, देवानंद दिक्का या दोघांनीच चाव्या घेतल्या. त्यानंतर बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 28 जणांना ताबापत्र देण्यात आले होते. त्यापैकी 5 जणांनी चाव्या घेतल्या.काही जणांना आपल्या नव्या घरात गणपती बसवायचा आहे तर काहींना गणेशोत्सवासाठी गावी जायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर चावी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.

सर्वांत आधी 31 क्रमांकाची चाळ तोडण्यात आली होती. त्यानंतर क्रमाने 30, 36, 11, 8, 9 या चाळी तोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे याच क्रमाने रहिवाशांना चावीवाटप केले जात आहे. काही रहिवाशांनी बुधवारी चावी घेतल्यानंतर त्याच दिवशी गणेशपूजन करून घेतले. काहींनी घरात केवळ नारळ ठेवला.

  • बजरंग काळे हे सुरक्षारक्षक आहेत. त्यांच्या जुन्या घरात केवळ एक पंखा आणि एक ट्युबलाइट होती. पण आता नव्या घरात 4 पंखे, 3 एक्झॉस्ट फॅन आणि 5-6 ट्युबलाइट लावाव्या लागणार आहेत. त्यासाठी 20 ते 25 हजार खर्च करावा लागणार आहे. खर्चाची जमवाजमव केल्यानंतरच त्यांना राहायला जाता येईल. आता बीडीडीच्या नव्या इमारतीत बरेच ग्राहक निर्माण झाल्याने वायरमन आणि भटजींनी त्यांचे शुल्क वाढवल्याचे काळे यांनी सांगितले. मात्र आता मुलाला अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र खोली देता येईल याचे त्यांना समाधान आहे. 36 व्या मजल्यावरच्या त्यांच्या घरातून समुद्र दिसतो. सगळ्यांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर केल्यास पुरेसे पाणीही मिळेल, असे ते सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT