मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला शेवटचे दोन दिवस शिल्लक असले तरी राजकीय पक्षांचा जागावाटपाचा प्रश्न सुटलेला नाही. अशा परिस्थितीत ज्या भागातील वॉर्डाचे जागावाटप झाले आहे, तेथील इच्छुक उमेदवारांना ए आणि बी फॉर्म द्यायला उद्या, सोमवारपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे ४८ तासांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी संपत आहे.
महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेची युती झालेली आहे, तर भाजप व शिंदे सेना महायुती म्हणूनच लढणार आहे. मात्र, या चारही पक्षांची जागावाटपावरून चर्चाच सुरू आहे. भाजप-शिंदे सेनेचे २०७ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित २० जागांवर त्यांचे अजूनही एकमत झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलेल्या ठाकरे सेना आणि मनसेमध्ये मुंबईतील काही जागांवरून मतभेद आहेत. त्यामुळे पक्षाकडून आदेश आल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी तयारी कधी करायची, अशा चिंतेत सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार आहेत. मात्र, ज्या जागांवर एकमत झाले आहे, तेथील उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश सर्वच पक्षांकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रचारासाठी उमेदवारांना मिळणार पंधरा दिवस
ज्या जागांचा तिढा सुटलेला नाही, तेथे इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितले जाईल, तर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे. तेथे अर्ज मागे घेण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी केली जाण्याच्या भीतीने पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. उमेदवारांची नावेच पुढे आली नसल्याने पक्षांचे कार्यकर्ते गोंधळलेल्या परिस्थितीत आहेत. कारण पंधरा दिवस शिल्लक राहणार आहेत.
काँग्रेसची आज पहिली यादी
काँग्रेसने मुंबईत वंचित बहुजन आघाडीसोबत मुंबई पालिकेसाठी युती करून नवा प्रयोग केला आहे. जागावाटपाची चर्चा पूर्ण करून त्यांनी मुंबईत आघाडी घेतली आहे. त्यामुळे उद्या, सोमवारी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना ए व बी फॉर्मही द्यायला सुरुवात करणार असल्याची माहिती पक्षाच्या एका नेत्याने दिली