मुंबई : राज्यातील सर्व बांगलादेशी घुसखोरांचे जन्मदाखले येत्या 15 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्याकडे इतरही काही शासकीय कागदपत्रे असल्यास तीही रद्द करण्याची मोहीम लवकरच हाती घेतली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बुधवारी ते मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहात आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतही त्यांनी घुसखोरी केली आहे. स्थानिक महसुली अधिकार्यांना हाताशी धरून ते वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढत आहेत. या दाखल्याच्या बळावर ते आपण येथील स्थानिक रहिवासी असल्याचे दर्शवत आहेत. या प्रकारांना प्रभावीरीत्या आळा घालण्यासाठी महसूल खात्याने विशेष मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे.
सिंधी कुटुंबांना मालमत्तापत्र देणार
दरम्यान, राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमधील सुमारे 5 लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री बावनकुळे यांनी दिली. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी समाजाकडे कोणत्याही प्रकारची सरकारी कागदपत्रे नाहीत. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार महसूल विभागाने त्यांना मालमत्तापत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधी समाजाच्या शिष्टमंडळाला फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असल्याचे समाधान बावनकुळे यांनी व्यक्त केले.