ठळक मुद्दे
बांगलादेशातून मायानगरीत आलेली आणि 'ज्योती माँ' या नावाने ओळख
किन्नर गुरू बाबू खानला पोलिसांकडून अटक
किन्नर म्हणून देहविक्री, भीक मागणे ही कामे करत कोट्यवधी रुपयांची कमाई
मुंबई : महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा चांगलाच गाजत असताना, मुंबई पोलिसांनी गोवंडी परिसरात मोठी कारवाई करत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले आहे. बांगलादेशातून आलेली आणि 'ज्योती माँ' या नावाने ओळखली जाणारी किन्नर गुरू बाबू खान हिला पोलिसांनी अटक केली. सध्या शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी आठ बांगलादेशींना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना भारतात आणून त्यांना इथे राहण्यास तिने मदत केल्याचे निष्पन्न झाले. काही तक्रारदारांनी देखील हीच माहिती दिल्यावर शिवाजी नगर पोलिसांनी या किन्नर माँला ताब्यात घेतले. तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
गेल्या ३० वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे ४४ वर्षीय किन्नर गुरू बाबू खान भारतात राहत होती आणि तिने २०० हून अधिक लोकांना आपले शिष्य म्हणून भारतात अवैधपणे आणल्याचा संशय आहे. बांगलादेशातून घुसखोरांना आणून इथे किन्नर म्हणून देहविक्री, भीक मागणे ही कामे करायला आणि यातून कोट्यवधी रुपये कमविले जात असल्याचा आरोप तक्रारदार कृष्णा आडेलकर यांनी केला आहे. बाबू खान ची कागदपत्रे तपासली असता तिचे जन्म प्रमाणपत्र बोगस निघाले.
गोवंडीतील शिवाजीनगर भागात ती बांगलादेशातून आलेल्यांना राहण्याची जागा पुरवायची. स्थानिक नागरिकांनी याविषयीची माहिती गोवंडीतील शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिच्याकडून बनावट जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले आहेत. याशिवाय, तिच्यावर अपहरण आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हेदेखील दाखल आहेत.
पोलिसांच्या तपासानुसार, बाबू खान उर्फ ज्योती माँ हे एक मोठे बेकायदेशीर रॅकेट चालवत होती. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद सीमेवरून ती अवैधमार्गान बांगलादेशी नागरिकांना देशात आणायची. त्यानंतर त्यांना कोलकात्यात काही दिवस थांबवून बनावट शाळेचे दाखले, जन्म दाखले बनवले जायचे. ही बनावट कागदपत्रे तयार झाल्यावर त्यांना मुंबईत आणले जायचे आणि गोवंडी भागात आश्रय दिला जायचा.
२० घरे, २०० भक्त आणि मोठे रॅकेट
बाबू खान हिची मुंबई उपनगरांत बऱ्याच ठिकाणी संपत्ती असल्याचे तपासातून समोर आले असून तिच्या नावावर मुंबईत २० पेक्षा जास्त घरे असल्याचे समजते. ही घरे तिने भाड्याने देऊन मोठी कमाई केली. तसेच तिचे २०० पेक्षा अधिक भक्त असल्याची माहितीही समोर आली आहे.