मुंबई : वांद्रे स्कायवाॅकचे गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले संथगतीच्या कामाविषयी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्कायवाॅकचे काम जलद गतीने पूर्ण करून दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्याचे निर्देश उपस्थित अभियंत्यांना दिले.
वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यालयादरम्यान महानगरपालिकेच्या माध्यमातून आकाशमार्गिकेची (स्कायवाॅक) पुनर्बांधणी केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आकाश मार्गिकेचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी आकाश मार्गिका नागरिकांच्या वापरासाठी खुली व्हावी, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.
आकाश मार्गिकेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे पुढील ३ महिन्यात पूर्ण करावीत. कामाच्या विविध टप्पानिहाय कालमर्यादा निश्चित करून द्यावे, कामात कोणताही विलंब होता कामा नये. विहित कालमर्यादेचे पालन न केल्यास कंत्राटदारावर सक्त कारवाई करावी, असे निर्देशही बांगर यांनी दिले.