मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे-कुर्ला संकुल, म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निर्मित नवीन स्काय वॉकचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम तसेच एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे आदी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हा उच्च प्रतीचा, दीर्घकाळ टिकणारा व आधुनिक सुविधांनी युक्त असा स्कायवॉक उभारण्यात आला आहे. सदर स्कायवॉकचे कामकाज विक्रमी वेळेत पूर्ण करणारे कार्यकारी अभियंता नामदेव रावकाळे, सहायक अभियंता प्रशांत जावळे, दुय्यम अभियंता अमित दसूरकर यांचा पालकमंत्री शेलार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते म्हाडा कार्यालय, पश्चिम पूर्व महामार्ग, वांद्रे न्यायालय, वांद्रे-कुर्ला संकुलच्या वाणिज्यिक परिसरातील कार्यालयांमधून मार्गक्रमण करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी हा स्कायवॉक उपयुक्त ठरणार आहे.
थेट रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे रस्ता ओलांडण्यासाठी उपलब्ध सुविधेमुळे पादचारी या स्कायवॉकचा वापर करतील. त्यामुळे अनंत काणेकर रस्त्यावरील गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल. स्कायवॉक संरचनात्मक स्थिरता व सुरक्षा प्रमाणपत्र तसेच रेल्वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
असा आहे स्कायवॉक
वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कलानगर जंक्शनपर्यंतचा नवीन स्कायवॉक एकूण 680 मीटर लांब व सरासरी 5.40 मीटर रूंद आहे. पादचाऱ्यांना विविध ठिकाणांहून सहज प्रवेश करता यावा यासाठी 4 जिने व 2 स्वयंचलित सरकते जिने आहेत. तसेच 14 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.