बांदिवली हिलला भिंतींचाच धोका pudhari photo
मुंबई

Landslide risk Bandivli Hill : बांदिवली हिलला भिंतींचाच धोका

भूस्खलनामुळे डोंगर खचण्याचीही रहिवाशांना भीती

पुढारी वृत्तसेवा
जोगेश्वरी : विशाल नाईक

जोगेश्वरी पश्चिमेतील एस.व्ही. रोडजवळच उंच टेकडीवर बांदिवली हिल, यादव नगर झोपडपट्टी वसली आहे. येथे काही वर्षांपूर्वी दरडींपासून संरक्षणासाठी संरक्षक भिंती उभारल्या आहेत. मात्र, यातील काही पडल्या आहेत, तर काही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या वसाहतींना भूस्खलनासह जीर्ण भिंतींचा धोका वाढला आहे.

या डोंगरावरी झोपड्यांचा पाया मजबूत नाही. त्यात डोंगरातील माती भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे डोंगर खचण्याचाही धोका आहे.यादवनगर झोपडपट्टीत काही वर्षांपूर्वी अतिवृष्टी होऊन संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा येथे संरक्षक भिंत बांधली नव्हती. त्यामुळे शेकडो रहिवासी जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. काही भागात संरक्षक भिंतीला संरक्षक जाळी नसल्यामुळे चालताना महिला, लहान मुले खाली कोसळण्याची भीती रहिवाशांना सतावत आहे. फक्त दीड फूट जागेतून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करावी लागत असल्यामुळे धोका निर्माण झाला होता.

अखेर अनेक तक्रारींनंतर म्हाडा प्रशासनाच्या माध्यमातून संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे. यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. बांदिवली हिल भागात जुन्या संरक्षक भिंती धोकादायक झाल्या आहेत. झुडुपे वाढल्यामुळे त्या कमकुवत झाल्याने वस्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील रहिवासी सोमनाथ लोके यांनी सांगितले.

संरक्षक भिंती कमकुवत

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील 15 ते 20 वर्षांपूर्वी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. यातील काही भिंती जुन्या झाल्या असून भिंतींमधून पाणी झिरपत आहे. त्यामुळे संरक्षक भिंत कोसळून जीवितहानी होण्याची भीती रहिवाशांना सतावत आहे. महापालिका प्रशासनाने भिंतींची पाहणी करून संरक्षक भिंतींमधील झुडुपे काढून भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

फक्त दीड फूट जागेतून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करावी लागत असल्यामुळे धोका निर्माण झाला होता.

बांदिवली हिल परिसरात विकास झाल्यामुळे थोडी भीती कमी वाटते. मात्र पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की आम्ही खूप घाबरतो. सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. यापूर्वी आमच्या वस्तीत संरक्षक भिंत क्षतिग्रस्त झाल्यामुळे आमच्या घरांना धोका निर्माण झाला होता. अजूनही काही भागांत सोयी सुविधा अपुर्‍या आहेत.
सविता मिश्रा, स्थानिक महिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT