...तर गणेश नाईकांचे व्हिडीओ चित्रपटगृहांत प्रदर्शित करू! pudhari photo
मुंबई

Ganesh Naik: ...तर गणेश नाईकांचे व्हिडीओ चित्रपटगृहांत प्रदर्शित करू, शिंदे सेनेच्या नेत्याचा भाजप मंत्र्यांना इशारा

शिवसेनेचा कडक शब्दांत इशारा; नाईक विरुध्द शिंदे वाद विकोपाला

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत आहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते. नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित केले जातील, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेनेने पत्रकार परिषदेत दिला.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. तरीही सातत्याने गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करत आहेत. दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी शनिवारी माध्यमांशी सवांद साधताना कडक शब्दांत गणेश नाईक यांना अंतिम इशारा दिला. यावेळी नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील, युवा सेनेचे अनिकेत म्हात्रे, महिला आघाडीच्या सरोजताई पाटील उपस्थित होते.

नवी मुंबईतील भूमिपुत्र, माथाडी कामगार आणि झोपडट्टीधारकांना मोफत घरे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव एफएसआय, नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या 14 गावांसाठी 70 कोटींचा निधी शासन देणार असून अवघ्या काही वर्षातच नवी मुंबईकरांच्या दारात विकासाची गंगा शिंदे साहेबांनी आणली आहे. नवी मुंबईचे राजे म्हणवणार्‍या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील, असा इशारा खासदार म्हस्के यांनी दिला.

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या 14 गावांच्या मूलभूत सुविधांसाठी 70 कोटींचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपलब्ध करून देणार आहेत. हा मूळ प्रस्ताव गणेश नाईक यांचाच होता. मग आता मात्र त्यालाही आक्षेप आपण घेत आहात. कंडोनियम अंतर्गत बांधलेल्या इमारतींना नागरी सुविधा आता एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे मिळणार आहे. त्यामुळे रस्ते, उड्डाणपूल बांधले जात आहेत.

गणेश नाईक हे मंत्री, पालकमंत्री असताना असे निर्णय का घेतले गेले नाहीत? आज हे निर्णय होत असताना, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे हे जनतेच्या हिताविरुद्ध जाणारे आहे. एकनाथ शिंदे हे केवळ खुर्चीपुरते सिमित नसलेले, तर रस्त्यावर उतरून जनतेसाठी लढणारे नेतृत्व आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासारखे ऑनलाईन नव्हे, प्रत्यक्ष कृतीतून नेतृत्व सिद्ध केले आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांमुळेच काहींना अनेक वर्षांनी मंत्रिपद मिळाले हे विसरून चालणार नाही, असा टोलाही खासदार म्हस्के यांनी लगावला.

गणेश नाईक यांच्यावर घाणेरडे गुन्हे दाखल झाले होते. दोन महिने ते फरार होते. अशी व्यक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नालायक म्हणते. गणेश नाईकांनी केलेले कारनामे नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. त्यांचे रील्स, फोटो, व्हिडिओ दाखवायला गेलो तर तीन तास पण कमी पडतील. त्यामुळे शिंदे साहेबांबद्दल पुन्हा असे बोललात तर चित्रपटगृहांमध्ये तुमचे कारनामे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
किशोर पाटकर, जिल्हा प्रमुख, शिंदे गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT