मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आचारसंहिता लागू करताना निवडणूक यंत्रणेने कोनशीला झाकल्या, योजना तथा विकासकामांचे फलक झाकले, अनेक फलकांवरील राजकीय नावे झाकली. इथपर्यंत सारे ठीक होते. आता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कुलाब्यातील पुतळा देखील हिरव्या कापडाने झाकून टाकण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुखांचा वारसा सांगत दोन शिवसेना मैदानात झुंजत असताना मुंबईत होणाऱ्या मतदानात या पुतळ्याकडे पाहून मुंबईकर आपला कौल देतील अशी भीती निवडणूक यंत्रणेला वाटली आणि शिवसेनाप्रमुखांचा पुतळा दृष्टीस पडणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. मुंबईत थोरामोठ्यांचे असंख्य पुतळे आहेत. पंडित नेहरूंचे आहेत, महात्मा गांधींचे आहेत, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.
मात्र मुंबईतील मराठी मतदानावर शिवसेनाप्रमुखांचाच प्रभाव पडेल असे निवडणूक यंत्रणेला वाटले आणि कुलाब्यात रिगल सिनेमाजवळच्या चौकात मध्यभागी उभारलेला हा एकमेव पुतळा झाकून टाकण्यात आला. याबद्दल आता शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया अद्याप उमटलेल्या नाहीत. मात्र मुंबईत मराठी माणसाचा मुद्दा तापला असताना शिवसेनाप्रमुखांची धास्ती यंत्रणेत आजही कायम आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.