पुढारी ऑनलाईन डेस्क: Bombay High Court|आरएसएस मुख्यालयाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी रईस अहमद शेखचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (दि.२१) फेटाळला. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
दहशतवादी कृत्य करण्याच्या उद्देशाने आरएसएस मुख्यालय, रेशीमबागसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करणाऱ्या पोरा पुलवामा, जम्मू-काश्मीर येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी रईस अहमद शेखचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला आहे. सरकारी वकिलांकडून जीपी आणि वरिष्ठ अॅडव्होकेट देवेन चौहान यांनी बाजू मांडली तर अर्जदार आरोपीकडून अॅडव्होकेट निहाल सिंग राठोड यांनी बाजू मांडली.
नागपूरच्या रेशीमबाग परिसरात असलेल्या आरएसएस संस्थापक डॉ. के.बी. हेडगेवार यांच्या स्मारकाची (डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर) रेकी केल्याच्या आरोपाखाली रईस अहमद शेख असदुल्ला शेख यांना १५ सप्टेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शेखने ११ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. शेख सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे.
फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, शेखने शहरातील महाल परिसरात असलेल्या आरएसएस मुख्यालयाचे सर्वेक्षण करण्याचा कट रचला होता, परंतु तो तसे करू शकला नाही. अधिवक्ता निहालसिंग राठोड यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीन अर्जात शेख यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी कोणत्याही बेकायदेशीर कृती करण्यासाठी वरील ठिकाणांची रेकी केली होती हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. तर शेख यांचे कृत्य बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या (UAPA) कक्षेत येत नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने न्यायालयात केला. सरकारी वकील देवेंद्र चौहान यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी शेख हा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे म्हटले होते.