पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांना खडे बोल सुनावले. या प्रकरणी संस्थाचालकांना अटक का होत नाही, संस्थाचालकांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस वाट पाहात आहेत का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या प्रकरणी Suo Moto खटला सुरू आहे.
राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ म्हणाले, "या प्रकरणात दोन आरोपपत्र दाखल आहेत. संस्थाचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटालळा असून त्यांनी यावर उच्च न्यायालयात अपील केलेले आहे."
सराफ यांच्या या माहितीवर न्यायमूर्तींनी ताशेरे ओढले. "या दोन लोकांना अजून अटक का केलेली नाही. तुम्ही यांना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहात आहात का?" असा सवाल न्यायमूर्तींनी केला. तसेच या सुनावणी वेळी विशेष तपास पथकाचे प्रमुख उपस्थिती नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणात तक्राकर्त्यांना आरोपपत्राच्या प्रती देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी आता २३ ऑक्टोबरला होणार आहे.