Chandrashekhar Bawankule Pudhari
मुंबई

Political News: मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावले

या सर्व चर्चांवर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री बदलाच्या शक्यता फेटाळून लावत बच्चू कडूंना खडे बोल सुनावले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर महायुतीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याने फडणवीस दिल्लीला जाणार आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सर्व चर्चांवर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री बदलाच्या शक्यता फेटाळून लावत बच्चू कडूंना खडे बोल सुनावले आहेत.

बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, राज्याचा मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा, अशी भावना प्रत्येक शिवसैनिकाची असू शकते. फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळावी आणि राज्याचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे यावे, अशी इच्छा कडू यांनी व्यक्त केली आहे. कडू यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत अंतर्गत वादंग निर्माण झाले आहे.

बच्चू कडू यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जावेत की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. महायुतीला जनतेने ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह स्पष्ट बहुमत दिले आहे. हे राज्यातील सर्वात मजबूत सरकार आहे.

आम्ही एकत्र आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला असून राज्याला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, अशा संवेदनशील विषयांवर सार्वजनिक व्यासपीठावर किंवा गावोगावी चर्चा करून भूमिका मांडणे योग्य नाही. महायुतीमध्ये समन्वय समितीची व्यवस्था आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध आहे. मुख्यमंत्रिपदासारख्या विषयांवर सार्वजनिक विधान करताना संयम बाळगण्याचा सल्लाही त्यांनी कडू यांना दिला.

प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. ती भावना स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीने एकमताने फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा विषय आता बंद झाला असून सरकार कार्यकाळ पूर्ण करेल, असेही बावनकुळे यांनी सुनावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT