मुंबई : सरकारी कर्मचार्यावर हल्ला करणे माजी आमदार बच्चू कडू यांना चांगलेच भोवले आहे. मंगळवारी सत्र न्यायालयाने कडू यांना दोषी ठरवून तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी शिक्षा सुनावताना आमदार आहात म्हणून कोणावरही हल्ला करण्याचा परवाना मिळालेला नाही,असे खडे बोलही सुनावले.
26 सप्टेंबर 2018 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशनच्या मेगा भरतीबद्दल चर्चा करण्यासाठी मुंबईतील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक सनदी अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयात गेले होते. चर्चेदरम्यान कडू आक्रमक झाले व त्यांनी अधिकार्याच्या टेबलावरून आयपॅड उचलत त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेच्या दुसर्या दिवशी सनदी अधिकार्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सत्र न्यायालयात या खटल्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने कडू यांना दोषी ठरवले तसेच उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत या शिक्षेला स्थगिती दिली. कडू यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावत जामीन मंजूर केला.
माजी आमदार बच्चू कडू यांनी तक्रारदार आयएएस अधिकार्याला मारहाण केली नव्हती आणि केवळ आयपॅडने हावभाव केला होता, परंतु धमकीचा हावभाव हा गुन्हेगारी शक्तीचा वापर होण्याची भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा होता असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.