बाबा सिद्दिकींवर वाय सुरक्षा भेदून झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?  file photo
मुंबई

बाबा सिद्दिकींवर वाय सुरक्षा भेदून झाडल्या गोळ्या; नेमकं काय घडलं?

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : Baba Siddiqui murder | अलिकडेच काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात डेरेदाखल झालेले ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन परप्रांतीय शूटर्सना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका बड्या गँगस्टर्सने सिद्दीकींच्या हत्येची सुपारी दिली असावी असा संशय आहे.

मुंबईत दोन्ही शिवसेनेंचे दसरा मेळावे सुरू असतानाच बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच हा भयंकर प्रकार घडला. अकस्मात अवतरलेल्या तीघा मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून चार ते पाच राऊंड फायर केले आणि हल्लेखोर पसार झाले. त्यापैकी दोन शुटर्सना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दोघेही शुटर्स हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील असून या हत्येमध्ये एका बड्या गँगस्टर्सचा हात असावा या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. हा बडा गँगस्टर म्हणजे कुख्यात लॉरेन्स बिष्णोई असू शकतो, असे म्हटले जात असतानाच एसआरए प्रकल्पातील वादाकडेही बोट दाखवले जात आहे.

बाबा सिद्दिकी वांद्रे परिसरातच राहत. ते काँग्रेसकडून १९९०, २००४, २००९ साली सलग तीन वेळा वांद्रे विधानसभा मतदारसंघातूनच आमदार म्हणून निवडून आले होते. २००४ साली त्यांना राज्यमंत्रीही करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी नाराज होवून ते १२ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अजित गटात दाखल झाले होते. त्यांचा मुलगा आ. झिशान सिद्दिकी यांचे वांद्रयातील निर्मलनगर, खेरवाडी जंक्शन परिसरात कार्यालय आहे. तिथे बाबा सिद्दीकी हे नियमित जात. शनिवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे तिथे गेले होते. रात्री सव्वानऊ वाजता ते कार्यालयाबाहेर फटाके फोडत असतानाच तिथे आलेल्या तिघा शूटर्सनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या छातीत लागून ते जागीच कोसळले. रक्तबंबाळ बाबा सिद्दीकी यांना जवळच्या लीलावती रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू ओढवला.

१५ दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी आली होती. विशेष म्हणजे त्याआधीपासूनच सिद्दीकींना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तेव्हापासून सिद्दीकी या सुरक्षेसह वावरत असत. ही सुरक्षा भेदून हल्लेखोर त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे सिद्दीकींचा गेम केल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे.

एसआरएचा वाद कारणीभूत ?

बाबा सिद्धीकी हे रियल इस्टेट व्यवसायाशी संबंधित होते. त्यांनी अनेक एसआरएसह इमारतींचे प्रोजेक्ट हाती घेतले होते. अशाच एसआरए प्रोजेक्टच्या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वांद्रे येथील बीकेसी मेट्रो स्टेशनजवळील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात एसआरएचा एक मोठा प्रोजेक्ट सुरु होता. हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीला मिळवण्यासाठी बाबा सिद्धीकी यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र या प्रोजेक्टवरुन त्यांचा विरोधकांसह स्थानिक रहिवाशांमध्ये वाद होता. काही महिन्यानंतर ते प्रकरण न्यायालयात गेले. या खटल्यात त्यांच्या विरोधात निकाल लागल्याने या प्रकल्पावरून उद्भवलेले वाद विकोपास गेले होते. त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट रखडला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पोलीस या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT