आंदोलकांनी आझाद मैदान ‘हाऊसफुल्ल’, अनेकांचा पथपथावर विसावा pudhari photo
मुंबई

Azad Maidan protest : आंदोलकांनी आझाद मैदान ‘हाऊसफुल्ल’, अनेकांचा पथपथावर विसावा

7 हजार आंदोलकांची क्षमता, आंदोलक 10 ते 12 हजारांच्या घरात

पुढारी वृत्तसेवा
मुंबई : प्रकाश साबळे

राज्यभरांतील कानाकोपर्‍यांतून येणार्‍या आंदोलकांसह मोर्च्यांकरांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे आझाद मैदान सध्या आंदोलकांना कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अनेक आंदोलनात आलेल्या आंदोलकांना पदपथाचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र सध्या आझाद मैदान परिसरात दिसून येत आहे.

मुंबईत विधी मंडळाचे अधिवेशन सुरू आहे. यामुळे राज्यभरांतील आंदोलने, मोर्चा, उपोषण आझाद मैदानावर धडकत आहेत. मात्र आझाद मैदानाचे क्षेत्रफळ 15 हजार स्क्वेअर फूट झाले आहे. तर आंदोलकांची क्षमता 7 हजारपर्यंत आहे. यामुळे एका दिवशी जर दोन मोठी आंदोलने आली तर अनेकांना मैदानाबाहेरील पदपथाचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे आझाद मैदानाची क्षेत्रफळ वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

त्रिकोणी आकाराचे असलेले आझाद मैदान हे 25 हजार स्क्वेअर फूट होते. मात्र गेल्या 5 वर्षांपासून मुंबई मेट्रो - 3 प्रकल्पासाठी मैदानाची जागा घेतल्याने आता ते 15 हजार स्क्वेअर फूटांपर्यंत आले आहे. मैदानावर सध्या अनुदानित शिक्षकांचे आणि गिरणी कामगार ही दोन मोठी आंदोलने सुरू आहेत. शिक्षक अनुदान आंदोलनात 5 हजार, गिरणी कामगार आंदोलनात 2 हजार आंदोलक सहभागी झाले आहेत. यामुळे उर्वरित आंदोलकांना मैदानाबाहेरच उभे राहावे लागत आहे. त्यांना आत बसण्यासाठी जागा नसल्याने पदपथाचा आधार घ्यावा लागत आहे.

मेट्रो कामाने अडविली जागा

मुंबई मेट्रो -3 भुमिगत सेवेच्या कामासाठी गेल्या 5 वर्षांपासून आझाद मैदानातील जागा मोठ्या प्रमाणात अडविण्यात आली आहे. भूमिगत मेट्रोचे स्टेशन अझाद मैदानातून जात असल्याने मेट्रो प्रशासनाने याठिकाणी 5 वर्षांपासून काम सुरु केले आहे. मात्र आता मेट्रो स्टेशनचे काम पुर्ण झाल्यानंतरसुध्दा सदर जागा मोकळी केली जात नाही.

मी 20 वर्षांपासून शिक्षिका आहे. बुधवारी सकाळी भिवंडी येथून आझाद मैदानावर आहे. परंतु आत बसण्यासाठी जागा नसल्याने नाइलाजाने आम्हाला पदपथावर बसावे लागत आहे.
मोमिन उमेरा इरबाज, आंदोलक, भिवंडी
मैदानात जागा नसल्याने बाहेर बसलो आहे. रात्री आझाद मैदानात झोपतो. 20 वर्षांपासून शिक्षक आहे. 2005 कार्यरत शिक्षकांना अजून 100 टक्के अनुदान मिळाले नाही. आंदोलकांना आझाद मैदानात आणि बाहेर सरकारकडून कुठलीही सुविधा नाही. त्यांना पाणीसुध्दा विकत घ्यावे लागते. याकडे सरकारने लक्ष द्यावे.
प्रशांत यादव, आंदोलक, सोलापूर
विनाअनुदानित शिक्षकांचा अनुदान टप्पा वाढीसाठी आमचे 5 जूनपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. परंतु मैदानात जागा नसल्याने दोन दिवसांपासून आम्ही पदपथावर बसलो आहोत. मैदान लहान झाले आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर, रस्त्यावर बसण्याची वेळ येईल.
सचिन आंबी, शिक्षक आंदोलक, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT