Ayush Mhatre record
मुंबई : लखनऊच्या स्टेडिअमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी शुक्रवारी झालेल्या टी-20 सामन्यात मुंबईच्या आयुष म्हात्रेने 53 चेंडूंत 110 धावा फटकावत धुवाधार खेळी केली आणि मुंबईला 7 गडी व 13 चेंडू राखून विदर्भावर विजय मिळवून दिला. 8 सणसणीत चौकार आणि सहा उत्तुंग षटकारांनी आयुष म्हात्रेची सजलेली ही खेळी रोहित शर्माचा विक्रम मोडणारी ठरली.
प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या खेळांमध्ये शतक झळकवणारा आयुष म्हात्रे हा सर्वांत तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. अवघ्या 18 व्या वर्षी त्याने लखनऊच्या स्टेडिअमवर हे शिखर गाठले. आधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता. रोहित शर्माने वयाची 19 वर्षे 339 दिवस पूर्ण झाले तेव्हा ही कामगिरी केली होती. या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर हाच विक्रम विसाव्या वर्षी करणारा उन्मुक्त चंद आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी एलिट ग्रुप ए साठी शुक्रवारी झालेल्या सामन्यात आयुष म्हात्रेने झंझावाती खेळी केली. विदर्भाने फलंदाजी करत 20 षटकांत 9 गडी गमावून 192 धावा केल्या. हे आव्हान मुंबईने 17.5 षटकांतच मोडून काढले. आतापर्यंत आयुषला सूर गवसलेला नव्हता. तो या सामन्यात असा काही गवसला की विदर्भाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडताना आयुष म्हात्रेने तब्बल 207.55 चा स्ट्राईक रेट नोंदवला. आता सौदीत खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आयुष म्हात्रेची निवड झाली असून, ही स्पर्धाही तो गाजवणार अशी आशा त्याच्या लखनऊच्या खेळीने पल्लवित केली.