सोशल मीडियावर ज्याच्या कविता व्हायरल होतायत, ज्याला महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतंय असा तरुण मराठी कवी अविनाश काठवटे याच्याशी पुढारी न्यूज पॉडकास्ट मध्ये मारलेल्या गप्पा आणि त्याने ऐकवलेल्या काही कविता!
शाळेत असल्यापासूनच कवितांची आवड
आई- वडील हे संगीत प्रेमी आहेत. माझी आई खूप छान भजन म्हणते. वडिलांना श्लोक माहितीये. अशा वातावरणात मी मोठा झालोय. मला शाळेत धड्यांपेक्षा जास्त कविता आवडायच्या, असे अविनाश सांगतो. पदवी शिक्षणासाठी संभाजीनगरात होतो, त्यावेळी काव्यधारा या कार्यक्रमात मी गेलो. तिथे सादर होणाऱ्या कविता आणि कवींना मिळणाऱ्या प्रतिसाद यातूनच मी कविता लिहायचं ठरवलं, अशी आठवण अविनाशने सांगितले. सुरूवातीला कविता कशी लिहावी याची फार माहिती नव्हती. पण छोट्या छोट्या वाक्यांमधून काही तरी संदेश द्यायचा हे माहिती होते. लॉकडाऊनच्या काळात मी यावर आणखी काम केले, असा अविनाशने पुढारी न्यूजच्या पॉडकास्टमध्ये सांगितले.
अविनाशची पहिली कविता कोणती?
माझी पहिली कविता प्रेम कविताच होती. सोशल मीडिया प्लाटफॉर्म्सचा आपण कसा वापर करतो त्यानुसार ते प्लाटफॉर्म तुम्हाला उपयोगी ठरतात. सोशल मीडियाचा मला खूप फायदा झाला. लोकांपर्यंत किती वेगाने पोहोचता येते, यावर सगळं ठरतं. माझ्या चाहत्याने मला मेन्शन करून पोस्ट केली तर मी ती पोस्ट रिशेअर करतो. याचा मला फायदा झाल्याचे अविनाशने सांगितले.
कविता हा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असू शकत का?
कविता तुम्हाला जगवू शकते पण ती टिकवू शकते का हा प्रश्न मलाही पडतो. 1990 च्या दशकातील गाणी आणि आत्ताची गाणी यात फरक आहे. हीच गोष्ट गीतकार, कवींसाठीही लागू होते, असं परखड मतही त्याने व्यक्त केले.