खेड : भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तांच्या लिलावाला अखेर यश आले असून, खेड तालुक्यातील मुंबके गावातील चारही भूखंड मुंबईतील एका बोलीदाराने खरेदी केले आहेत. अनेक वर्षे रखडलेल्या या प्रक्रियेला अखेर गती मिळाली.
केंद्र सरकारने 5 मार्च 2026 रोजी ‘सफेमा’अंतर्गत हा लिलाव पार पाडला. या प्रक्रियेत सहभागी बोलीदारांची अधिकृत ओळख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी मुंबईतील एका गुंतवणूकदाराने सर्वाधिक बोली लावत चारही मालमत्ता आपल्या नावावर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या लिलावातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा भूखंड म्हणजे सर्व्हे क्रमांक 442 (भाग 13-ब) होय. या भूखंडासाठी दोन बोलीदारांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली होती. राखीव किंमत 9.41 लाख असताना मुंबईतील बोलीदाराने 10 लाखांहून अधिक बोली लावत हा भूखंड मिळवला.
इतर तीन भूखंड सर्व्हे क्रमांक 533 (2.33 लाख), सर्व्हे क्रमांक 453 (8.08 लाख) आणि सर्व्हे क्रमांक 617 (15,440 रु.) यासाठी एकच बोलीदार पुढे आला होता. आवश्यक अटी पूर्ण करत त्याने हे तिन्ही भूखंडही विकत घेतले.
हे सर्व भूखंड रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावात असून, हे गाव दाऊद इब्राहिमचे गाव आहे. या जमिनींपैकी काहींची नोंद पूर्वी त्याची आई अमिना बीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. 2017, 2020, 2024 आणि 2025 या वर्षांतही लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, दाऊद इब्राहिमच्या नावाशी संबंधित भीती, संभाव्य कायदेशीर अडचणी आणि बोलीदारांचा अभाव, यामुळे ते प्रयत्न अपूर्ण राहिले होते.
दाऊद इब्राहिम हा 1993 प्रकरणातील मुख्य आरोपी असून, या भीषण साखळी स्फोटांमध्ये 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, तो सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असल्याचे मानले जाते. मुंबके येथील मालमत्तांच्या यशस्वी लिलावामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. यामुळे बेकायदेशीर मालमत्तांवर सरकारचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, भविष्यात अशा कारवायांना अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे.