मुंबई : दीड वर्षापूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतूवर खड्डे पडल्यामुळे कंत्राटदाराल 1 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच दोष दायित्व कालावधी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.पुढील 5 दिवसांत रस्त्याचा पृष्ठभाग दुरुस्त करण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत.
मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कमी वेळात पार करता यावे यासाठी 21.8 किमीचा अटल सेतू बांधण्यात आला आहे. यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. केवळ 18 महिन्यांपूर्वी या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता नवी मुंबईच्या दिशेला जाणार्या मार्गिकेवर तीन ठिकाणी खड्डे पडले आहेत. शुक्रवारी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगर आयुक्त व प्रकल्पप्रमुख विक्रम कुमार यांनी 22 किमी लांबीच्या संपूर्ण अटल सेतूची पाहणी केली.
नवी मुंबईकडे जाणार्या मार्गावरील 2 किमीच्या पट्ट्यात काही ठिकाणी पृष्ठभागावर किरकोळ झीज झाल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे. याचे प्रमुख कारण सतत पडणारा जोरदार पाऊस व अविरत वाहतूक प्रवाह असल्याचे सांगितले जात आहे. एमएमआरडीएच्या पथकाने कंत्राटदार देवू-टाटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यांना या सेतूवरील हा पृष्ठभाग दुरुस्त करण्याचे काम पुढील पाच दिवसांत पूर्ण न केल्यास कंत्राटदाराविरुद्ध अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
कंत्राटदारावर कारवाई
कंत्राटदाराला सध्या 1 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. जानेवारी 2026 मध्ये संपणारा दोष दायित्व कालावधी आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण प्रभावित भाग पुन्हा नव्याने तयार करण्यात येईल व ते काम कंत्राटदाराला डेंस बिट्युमिनस मॅकॅडम व अॅस्फाल्ट काँक्रीटचा वापर करून स्वखर्चाने करावे लागणार आहे.
अटल सेतू रचनात्मकदृष्ट्या भक्कम व सुरक्षित असून या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेचे व विश्वासार्हतेचे पालन करण्यासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे. नागरिकांना वेळेवर कारवाई व कठोर देखरेखीची हमी देण्यात येत आहे.एमएमआरडीए