भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार  
मुंबई

Ashok Kharat controversy | भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी 'त्यांचे' संबंध, संजय राऊत यांनी थेट नावं घेतली!

Ashok Kharat controversy | मत मिळविण्यासाठी असंख्य बुवाबाजी महाराष्ट्राच्या राजकारणात आणले गेले

पुढारी वृत्तसेवा

Ashok Kharat controversy

नवी दिल्‍ली : "भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असलेल्या नऊ मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील, असे मी म्हटलं नव्हतं. मंत्रिमंडळातील नऊ मंत्री हे अशोक खरातचे कडवट भक्त आहेत. माजी मंत्री भक्त आहेत, पण एकाचेही नाव समोर आले नाही, यालाच राजकारण म्हणतात. अशोक खरात प्रकरणी राजकारण करू नका,असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. आम्ही राजकारण करत नाही. राजकारण कोण करते, राजकारण कशाला म्हणतात हे मी त्यांना सांगतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आपण घेतला, कारण त्या बाई 'सॉफ्ट टार्गेट' होत्या; पण ते जे कोणी खरात बाबा आहेत, त्यांना बळ देणारे लोक आपल्या मंत्रिमंडळात आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना वाचवायचं आहे," असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २३) माध्यमांशी बोलताना केला.

मतांसाठी असंख्य बुवा-बाबा महाराष्ट्राच्या राजकारणात आणले गेले

आपण या महाराष्ट्रामध्ये शाहू, फुले, आंबेडकर, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचे लोक आहोत; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका बुवाबाजीला उत्तेजन देण्याची कायम राहिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये किंवा काही काळामध्ये सत्ता स्थापनेसाठी, मत मिळवण्यासाठी असे असंख्य बुवा आणि बाबा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणले गेले. त्यांनी वारकरी संप्रदायाला राजकारणामध्ये ओढलं. काय सांगावं, उद्या भविष्यामध्ये खरात बाबाचे खूपच अनुयायी आहेत म्हणून त्यांना भाजपमध्ये सुद्धा शुद्ध करून घेतलं जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मंत्री असूनही तुमचा आत्मविश्वास का ढेपाळला?

अशोक खरात याच्या संपर्कात असणारे मंत्री किंवा जे इतर लोक आहेत, त्यांची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे. तुमचं असं आत्मबल का घसरलं? तुमचा आत्मविश्वास का ढेपाळला? मंत्री असतानाही तुम्हाला या बुवाबाजीचा आधार घ्यावा लागला? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीसांनी जबाबदारीने बोलावे

मुख्यमंत्री किंवा त्यांचे लोक म्हणतात की, खरातच्या शेतीला कोणत्या वर्षी पाणी दिलं गेलं, कोणत्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला? कॅबिनेटची उपसमिती होती, अशी माझी माहिती आहे. त्या उपसमितीवर कोण होतं, याची माहिती घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून जबाबदार विधान आणि भूमिका येणं गरजेचं असतं. अशा संवेदनशील प्रश्नावर तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे म्हणून "काही काळापूर्वी दुसरं सरकार होतं त्याने म्हणे पाणी दिलं, अमुक केलं" ही अत्यंत थोतांड भूमिका आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाविषयी धडे देण्यासाठी एखादं शिबिर ठेवा

मंत्रिमंडळातले कोणते कोणते मंत्री सातत्याने खरात बाबांकडे जात होते, त्यांना सर्व गुन्ह्यांची कल्पना होती. तुमच्या मित्रपक्षातले आमदार, खासदार खरात बाबांकडे जात होते, त्यांना ताकद देत होते. मी असं कधीच म्हणणार नाही की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर सुद्धा त्यांचे फोटो आहेत; कोणीही कधीही फोटो काढू शकतं. खरात बाबाचे अमित शाह, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो आहेत. तुमच्या मंत्रिमंडळात जो खरात बाबांचा भक्तगण आहे, त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय? असा सवाल करत, तुम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये खरात बाबाच्या मंत्री भक्तगणांना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाविषयी धडे देण्यासाठी एखादं शिबिर ठेवा, महाराष्ट्राची परंपरा काय आहे हे त्यांना सांगा, असेही राऊत म्हणाले.

भोंदूबाबा खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसच राजकारण करत आहेत

भोंदूबाबा खरात प्रकरणात कोणीही राजकारण आणत नाही. राजकारण जर कोणी करत असेल, तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. ज्यांनी अघोरी पूजा केल्या किंवा तिथे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केल्याची चर्चा आहे, त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, हे मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे. अंधश्रद्धा किंवा जादूटोणाविरोधी जो कायदा आहे, त्या कायद्याचा वापर तुम्ही कधी करणार? असा सवाल करत महाराष्ट्र सरकारमधील उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, तुमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष हे सगळे खरात बाबाचे भक्त आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

गंडे-दोरेवाले हेच त्यांचं हिंदुत्व

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीत, आध्यात्मिक विषयात सुद्धा राजकारण आणण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराच्या काही शाखांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला चिंता वाटते. अशा प्रकारचे जे बुवा महाराज आहेत, गंडे-दोरेवाले, हेच त्यांचं हिंदुत्व आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

फडणवीसांच्या हाती मजबूत गोष्टी लागल्या आहेत

"देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन मुतारी' सुरू केलं आहे. त्यांनी हे ऑपरेशन उगाच सुरू केलेलं नाही. त्यांच्या हातामध्ये काही मजबूत अशा गोष्टी लागलेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये राजकारण कोणत्या अघोरी पद्धतीने केलं जातंय? महाराष्ट्रात जादूटोणे सुरू आहेत. महाराष्ट्रही बहुतेक देशातील जादूटोण्यांची राजधानी केली जाईल असं दिसायला लागलं आहे," असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

खासदारांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही

रविवारी शिवसेना खासदारांची बैठक 'मातोश्री'वर पार पडली. नाराज खासदारांची समजूत काढली किंवा त्यांच्या काही समस्या ऐकून घेतल्या गेल्या असं सांगितलं गेलं. खासदार नाराज असतील तर ते शिवसेना पक्षावर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर नाराज नाहीयेत; त्यांची तीव्र नाराजी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर आहे. तुम्ही विरोधी पक्षाच्या खासदारांना एक रुपयाचा निधी देत नाही, त्यामुळे मतदारसंघात काम करता येत नाही. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना कोट्यवधींचा निधी देता आणि शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या खासदारांना केंद्र सरकार निधी देत नाही, त्यामुळे कोंडी होते, असेही संजय राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT