Ashok Kharat Case
मुंबई : "मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी दिली गेली आहे. 'ताज का राज' फुटला, तर मातोश्रीच्या तोंडचे पाणी पळेल," अशी सूचक 'एक्स' पोस्ट भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
शीतल म्हात्रे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना उद्देश म्हटलं आहे की, सुषमाताई, मूळ विषय हा ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे. त्यामुळे उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका. खरातला पाण्याची लाईन देण्यासाठी ताजमध्ये कोणी बैठक घेतली होती? त्यासाठी मध्यस्थी करणारा नेता कोण होता? पाईपलाइनचा जी.आर. काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमने आदेश दिला होता की नाही ? त्यामागे कुठली न्यूमरॉलॉजी होती? याची चर्चा व्हायला पाहिजे ना, ताई?
ताई, त्यावेळी तुम्ही शिवसेनेत नव्हत्या… वंदनीय बाळासाहेबांना शिव्याशाप देण्यात आणि उबाठा व आदूबाळाला दहीहंडीच्या थरावर चढवण्यात मग्न होत्या. त्यामुळे तुम्हाला कदाचित माहिती नसेल.!! त्यामुळे ज्यांच्या आदेशाने तुम्ही ही टीवटीव करत आहात, त्यांना जाऊन विचारा – ताज का राज, असेही शीतल म्हात्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची खरातसोबत 'ताज'मध्ये बैठक किंवा भेट झाली होती. त्यानंतर तिकडे विनंती केल्यावर खरातला पाण्याची पाईपलाईन दिली गेली. ४० किलोमीटर लांबून त्याच्यासाठी पाणी आणले, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना केला.
भोंदू बाबा अशोक खरातवर नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत पोलिसांची कारवाई झाली आहे. जिवे मारण्याच्या धमक्या देत आर्थिक लूट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. २१ देशांमध्ये फिरवत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचाही दावा आहे. मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी तो देत असे. फिर्यादीकडून मर्सिडीज कार खरेदी करून घेतल्याचा, परदेश दौरे, महागडे उपचार आणि फार्म हाऊसचा खर्च उकळल्याची माहिती समोर आली आहे. खरातवर आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्याची मालमत्ता आणि आर्थिक फसवणुकीचा तपास सुरू आहे. राजेंद्र जासूद यांनी खरातवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रामुख्याने ९० लाखांचे फर्निचर पूजाविधीच्या नावावर उकळल्याचे म्हटले आहे.