Ashok Kharat case
मुंबई: शेकडो महिलांचे लैंगिक शोषण व फसवणुकीचे गंभीर आरोप असलेला भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्यातील मोठ्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे, आशिष शेलार यांच्यासह अन्य नेत्यांचे खरात सोबतच्या संभाषणाची कॉल डिटेल्सची (सीडीआर) ची कॉपी अंजली दमानिया यांना मिळाली आहे. ती कॉपी डीजी आणि मुख्यमंत्र्यांना पाठवली असून याबाबत एसआयटीच्या चौकशी अधिकारी तेजस्वी सातपुते यांनाही माहिती दिली आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले होते की, अशोक खरात हे माझे गुरु आहेत, त्यांच्याबद्दल मला काही माहिती नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध आहेत. मात्र, CDR मधून समोर आलेल्या माहितीनुसार रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 177 फोन कॉल झालेले आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांचे खरात याच्याशी 236 कॉल झालेले आहेत, अशी माहिती दमानिया यांनी आज (दि. ३) माध्यमांशी बोलताना दिली.
या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावही जोडले जात होते, मात्र CDR नुसार त्यांचेही अशोक खरात यांच्याशी 17 कॉल झालेले आहेत. या 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोइंग कॉल आहेत. सर्वाधिक संभाषण 21 मिनिटांचे झालेले आहे. जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा व्यक्तीशी 17 वेळा बोलत असतील, तर ते कशासाठी झाले याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे आहे, असे दमानिया यांनी यांनी म्हटले आहे.
तसेच, भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी अशोक खरात यांना 8 वेळा कॉल केले आहेत. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही 8 कॉल केले आहेत, तसेच भाजपचे आशिष शेलार यांचाही एक कॉल त्यांना गेलेला आहे. ही फक्त नॉर्मल कॉलची माहिती आहे. व्हॉट्सअॅप कॉलची माहिती उपलब्ध नाही. जर नॉर्मल कॉल इतके झाले असतील, तर व्हॉट्सअॅप कॉल किती झाले असतील याची कल्पनाही करता येत नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
या सर्व कॉलमध्ये सर्वाधिक संभाषण तृप्ती खरात यांच्याशी झाले आहे, जे घरचे असल्यामुळे ते स्वाभाविक मानता येईल. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रूपाली चाकणकर यांचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात एकूण 33,727 सेकंद इतके संभाषण झालेले आहे. इतका वेळ कोणत्याही गुरुशी कोणी बोलत नाही, त्यामुळे रूपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात नेमके काय संभाषण झाले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तिसरे नाव दीपक लोंढे यांचे आहे. लोंढे हे दीपक केसरकर यांचे अतिशय जवळचे व्यक्ती मानले जातात. त्यांच्या आणि अशोक खरात यांच्यात 190 कॉल झालेले आहेत, आणि एकूण 30,529 सेकंद संभाषण झालेले आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे खरात यांना राज्याबाहेरूनच नव्हे तर परदेशातूनही कॉल येत होते. कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया आणि ओमान अशा देशांतूनही त्यांना फोन येत होते. ही सर्व माहिती एसआयटीकडे दिलेली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.