मुंबई

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना मिळणार २० हजारांचे अनुदान

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्व नियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अथितीगृह येथे विशेष बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयाचे वारकरी संप्रदायाने टाळ्या आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करतानाच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच यावेळीही टोल माफी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गृह विभागाने आवश्यक त्या सर्व गोष्टीची वेळीच दखल घेऊन पुरेपूर तयारी करण्याचे निर्देश या बैठकीत दिले. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मख्य सचिव डॉ. आय. एस. चहल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, अक्षयमहाराज भोसले, श्री. से विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त माधवी निगडे-देसाई, यांच्यासह मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख उपस्थित होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे, सोलापूर आणि साताराचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT