मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आली तेव्हा अचानक जाणवले की, अरे आशाताई म्हाताऱ्या आहेत. रसरशीत असलेला हा आवाज खरे तर चिरतरुण. त्या म्हाताऱ्या झाल्या, ही जाणीव काल काळीज चिरत गेली अन् त्यांच्या तडक थेट स्वभावानुसार त्या लगेच काही तासांत गेल्याही. नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त भेटल्या तेव्हा ‘मी छान आहे, अजिबात म्हातारी नाही मी’ असे आवर्जून सांगत होत्या त्या. त्याआधी काही महिन्यांपूर्वी रेडिओ क्षेत्रातल्या करमणूकप्रधान जॉकीचा कार्यक्रम झाला तेव्हा विनंतीला मान देऊन आशाताई मनापासून गायल्या. दोन ओळी गुणगुणता त्या संपूर्ण कडवे मनापासून गायल्या.
आशाताई म्हणजे चिरतरुण स्वर. मनस्वी कलाकार आणि उत्तम माणूस. मंगेशकर कुटुंबीयांना दीर्घ आयुष्याचे वरदान आहे, म्हणणाऱ्या आशाताई भन्नाट होत्या. ‘पिया तू अब तो आजा’पासून ‘दिन तैसी रजनी झाली गे माये’पर्यंतची गाण्यांची रेंज. आवाजाची फिरत थक्क करणारी. उडत्या चालीची गाणी लीलया गाणाऱ्या आशाताईंची जीवननिष्ठा कमालीची विलक्षण. लतादीदी प्रेमाने आणि गमतीने म्हणायच्या आशा म्हणजे मस्ती. आशा म्हणजे कोणताही निर्णय अमलात आणणारी बहीण. मास्टर दीनानाथ यांच्या निधनानंतर मंगेशकर भावंडे पोरकी झाली.
लतादीदी कुटुंबाला सावरायची जबाबदारी पेलू लागल्या. कुटुंबावर घाला आला. दिवस फिरले अन् आशाताईंनी शाळेत मारतात म्हणून शिक्षण सोडले. लहानग्या हृदयनाथला कडेवर घेऊन त्या खेळायच्या. मग, आयुष्याची वेगळी वाट चोखळत त्या भोसले झाल्या. तरुण वयातल्या निर्णयाची किमत द्यावी लागली. चुकलंय म्हणून रडत बसल्या नाहीत, तर नव्याने उभ्या राहिल्या. ‘एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी’ हे त्यांचे गाणे असेल किंवा ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’ सारखे काळीज चिरत जाणारे गीत. सगळ्याच मंगेशकरांनी मराठी माणसाच्या आनंदाच्या विरहाच्या, दु:खाच्या क्षणांना स्वरसूर दिले. मीलनाचा असीम आनंद असो, विरहाच्या वेदना असो, आशाताईंचा सुरेल आवाज मानवी जाणिवेचा होता.
लतादीदी स्वर्गीय स्वर, तर आशाताई पार्थिवाचे रंग. एका कुठल्याशा मुलाखतीत आशाताई म्हणाल्या, दुःख झेलावे लागले की, स्वर सुंदर, गंभीर होतो. जीवनाचे सार त्या सुरात मग येते. कलाकाराच्या वाट्याला वेदना आलीच पाहिजे. वेदवाक्य मानत मग ते काहीजण. आशाताईंनी तर कित्येक वार झेलले होते. निर्णयांची किंमत मोजली होती आणि त्यामुळे कुठलीही कटुता अगदी घरच्यांविषयीही किल्मीष, कटुता मनात न ठेवता त्या स्वर्गीय सुखाचा आनंद देत होत्या. लेकीच्या, वर्षा भोसलेच्या निधनानंतर आशाताई आरंभी काहीशा कोलमडल्या. कातर झाल्या; पण नंतर स्वतःला सावरत वाट्याला आलेला दुःखाचा पेला रिचवत आशाताई कायम रसिकांना रिझवत राहिल्या.
एखादवर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मराठी दिनानिमित्त कवितांचा कार्यक्रम केला तेव्हा आशाताई बेधुंदपणे सामील झाल्या आणि राज ठाकरे यांच्या हाकेला मी केव्हाही ओ देते म्हणून महत्त्वाची एक गाण्याची झलक दाखवत राहिल्या. त्यांची प्रत्येक कृती ही अत्यंत मैत्रीपूर्ण असायची आणि तरुण आहे आशा अजूनही याची परिचायक असायची. आशाताई खितपत न पडता आजारामुळे खाटे ला चिकटून न राहता या जगातून निघून जायला हवे म्हणायच्या, हे त्यांच्या स्वभावानुसारच होते. अचानक त्या गेल्याच. कोल्हापूरच्या आठवणीत रमणाऱ्या, सुधीर फडकेंपासून श्रीधर फडकेंपर्यंत, त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या बर्मन घरातल्या सचिनदेवपासून आर. डी.पर्यंत आशाताई पिढ्यान् पिढ्या संगीतकारांना स्वर देत रसिकाचे कान तृप्त करत आल्या. आता लतादीदींचा सूर इथे असला, तरी त्या स्वतः नाहीत.
आवाजके दुनिया के दोस्त ते दुःख निभावून नेत असताना आशाताई आहेत असे स्वतःला समजावत. आता आशाताईही चिरंतनाच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. खरे तर, हे कधीतरी होणारच होते; पण आशाताई अशा अचानक मैफल सोडून जातील, असे अजिबात वाटलं नव्हतं. नागपुरात कधीतरी अत्यंत विपन्न अवस्थेतले सुरेश भट त्यांना भेटायला गेले तेव्हा या स्वरांच्या बादशहाचे स्वागत करायला आशाताईंनी त्यांची सर्वतोपरी काळजी घेणारे सारे काही केले होते. आशाताई तशाच होत्या. दुनिया उधळून लावणाऱ्या. त्या आता या जगात नाहीत; पण त्यांचे सुवर्ण गाणे मात्र कायम इथेच राहणार आहे. उरले उरात काही आभास चांदण्याचे हे आशाताईंचं सुरेश भटांच्या लेखणीतून उतरलेले अजरामर गाणे. आशाताई कधीच जात नसतात. जसे केशवसुत कसले गेले, ते तर गातच बसले ही कविता आहे ना, तसेच. आशाताई कायम आपल्यात असतील. नश्वर शरीर जातं; पण स्वर कायम राहतो. ही तंत्राची केवढी तरी देणगी.
शरीराने आशाताई नसल्या, तरी त्या स्वररूपाने आपल्यातच आहेत, हे भगवंताचे उपकार. त्यांच्या आवाजाची चिरतरुणता कधीच संपणार नाही. ‘तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे’चा अनुभव खरे तर वेगळ्या शब्दांत मांडावा लागेल. स्वर आहेत इथेच अजूनही, आशाताई सोडून गेल्यात का हो, असा आजचा दिवस. विनम्र श्रद्धांजली!