Asha bhosale | उरले उरात काही आवाज चांदण्यांचे!  
मुंबई

Asha bhosale | उरले उरात काही आवाज चांदण्यांचे!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जगभरातील कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी अंतस्थ स्वरसम्राज्ञी, बहुआयामी ज्येष्ठ गायिका आशा भोसले (92) यांचे रविवारी ब्रीच कॅन्डी रूग्णालयात निधन झाले. शनिवारीच त्यांना छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच आशाताईंनी जगाचा निरोप घेतला आणि गेली आठ दशके अखंड सुरू असलेला स्वराभिषेक थांबला. सप्तसुरांचे आकाश पोरके झाले आणि उराउरांत चांदण्यांचे आवाज तेव्हढे उरले आहेत!

आशाताईंच्या पश्चात बंधू व ज्येष्ठ संगीतकार पं. हद्यनाथ मंगेशकर, भगिनी गायिका उषा व मीना खडीकर, मुलगा आनंद, सून व नात जनाई आणि त्यांच्या स्वर्गीय आवाजाने अमर झालेली विविध भाषांतील चौदा हजारांवर गाणी आणि या गाण्यांसाठी वेडे झालेले त्यांचे कोट्यवधी रसिक असा मोठा परिवार आहे. आशाताईंच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी ब्रीच कॅन्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले तेंव्हापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी दुपारी समाजमाध्यमांवर आशाताईंच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करत लोकभावनेलाच वाट मोकळी करून दिली होती.

शनिवारपासून ब्रीच कँडी रुग्णालयाने आशाताईंच्या तब्येतीबद्दल अधिकृत माहिती देणारे कोणतेही निवेदन प्रसृत केले नव्हते. मात्र आशाताईंची नात जनाईने इंस्टा पोस्टवर आपल्या आजीला छातीत संसर्ग झाला असून चाहत्यांनी धीर धरावा, असे आवाहन केले होते. मात्र आशाताईंच्या तब्येतीला रविवारी सकाळीही आराम पडला नाही. त्यांचे एकेक अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती आशाताईंचे चिरंजीव आनंद भोसले यांनी माध्यमांना दिली.

आशाताईंचा स्वरयज्ञ रविवारी थांबला आणि त्यांच्या लक्षावधी सुरावटी कानात वाजू लागल्या, मनात निनादु लागल्या. सुरांची प्रदिर्घ सेवा अध्यात्माच्या उत्कट बिंदूपर्यंत घेऊन जाते असे म्हणतात. तिथे सूर आणि गायक यांच्यात कोणताही भेद उरत नाही. असा सूर इच्छा, आकांक्षा, मोह, यश किंवा समाधान या पलीकडे जाऊन फक्त शांतता देतो. दुःखावर मायेची फुंकर घालतो, सुखात तोच सूर दिलदार मित्रासारखा खांद्यावर हात ठेवून बागडतो आणि एकटेपणात आश्वस्त करतो. अशा सुरांची थोरवी शब्दात मांडता येत नाही. मनापासून आत्म्यापर्यंत पोहोचणारे सूर आयुष्याचे अनेक टप्पे तोलून उभे राहतात; ते ही निर्मोहीपणे !

जगण्यातल्या सन्मानाचा आणि अपयशाच्या अपमानाचा कोणताही स्पर्श अशा महान गायकांना होत नसावा. कारण त्यांच्या भोवती दैवी सूरांचे वलय त्यांना सामान्यपणाच्या कक्षेतून उचलून अलगद विरक्त करते ! सुरांशी साधलेल्या एकरूपतेतून आलेली ही उन्मनी अवस्था मोक्ष देते. त्या सूरब्रम्हात सामावून टाकते. हे स्वरनक्षत्रच हरवले की उरतात ते फक्त आवाज चांदण्यांचे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT