नवी दिल्ली : ‘मी कुणाल कामरा यांचा कार्यक्रम यापूर्वी कधीच पाहिला नव्हता मात्र आज बघितला. कुणालने केलेल्या कवितेतील वाक्य न वाक्य बरोबर आहे. सत्य हे कटू असते आणि ते झोंबते,’ अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. तसेच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर जे येते ते बघता आम्हाला रोज मारामारी करावी लागेल मात्र आम्ही काही करत नाही, असेही ते म्हणाले. तर शून्यातून पुढे आलेल्या आणि मुख्यमंत्री बनलेल्या माणसाची थट्टा करण्याचा पेड प्रयत्न असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा म्हणाले.
कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राजधानी दिल्लीतही चांगलेच उमटले. यासंदर्भात बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र पहिली तर लक्षात येईल की ते कसे फटके लावायचे. इंदिरा गांधी, शरद पवार यांची व्यंगचित्रे त्यांनी काढली. मात्र शरद पवार कधीच बाळासाहेब यांच्यावर बोलले नाहीत. चिडचिडपणा कधीच केला नाही. शिंदे गटाने व्यक्त होताना वैचारिक उत्तर द्यावे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे देशाची संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था आहे की नाही, अशी शंका वाटते. मी न्यायाला चूड लावणारी कविता लिहिली होती, असेही ते म्हणाले. न्यायाधीश वर्मा प्रकरणावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातील व्हिडीओ जारी केले आहेत. रंजन गोगाई सुद्धा भ्रष्ट आहेत, असेही ते म्हणाले.
तर मिलिंद देवरा म्हणाले की, "विनोद हा कोणत्याही समाजाचा एक आवश्यक प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः व्यंगचित्रकार होते. मात्र व्यंग आणि वर्गवादी, उच्चभ्रू, पैसे देणारे एजंट असणे, पक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करणे यात खूप फरक आहे. नरेंद्र मोदींची थट्टा करण्याचा प्रयत्नही काही लोकांनी केला. ते अतिशय सामान्य पार्श्वभूमीतून आले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान बनले. त्याचप्रमाणे शून्यातून आलेल्या आणि देशाच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेल्या माणसाची थट्टा करण्याचा प्रयत्न कामराच्या माध्यमातून करत आहेत. मात्र त्यांना लोकांनी पुर्णपणे नाकारले आहे, असेही ते म्हणाले.