कला अभ्यासक्रमांचे शिक्षण महागले pudhari photo
मुंबई

Arts education fees hike : कला अभ्यासक्रमांचे शिक्षण महागले

पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या शुल्कात वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : कला संस्थांतर्फे राबवल्या जाणार्‍या विविध पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या शुल्कात तब्बल 30 वर्षांनी वाढ झाली आहे. या अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत 5 हजार 300 रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता 15 हजार 400 इतके शुल्क झाले आहे.

राज्यातली विविध अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 90 टक्के अनुदान दिले जाते. उर्वरित 10 टक्के वेतनाशिवाय आस्थापना चालवण्यासाठी येणारा खर्च संस्थांनाच उचलावा लागतो. हा खर्च विद्यार्थी भरत असलेल्या शुल्कातून भागवला जातो. पण गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी शुल्कात वाढ झालेली नाही. त्या तुलनेत वीज बिल, आणि इतर खर्च वाढले आहेत.

त्यामुळे पुण्याच्या भारतीय कला प्रसारिणी सभेने कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी 100 टक्के अनुदान देण्याची किंवा अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत सुधारणा करत उर्वरित 10 टक्के तूट भरून काढण्याची मागणी केली होती. या मागणीवर विचार करत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शुल्क रचनेत सुधारणा केली आहे.

यापूर्वी प्रत्येक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी 5 हजार 300 रुपये आकारले जात होते. यात वाढ करत आता विद्यार्थ्यांकडून 15 हजार 400 रुपये शुल्कापोटी द्यावे लागणार आहेत. या 15 हजार 400 रुपयांपैकी 14 हजार 400 रुपये अशासकीय कला महाविद्यालयांना वेतनावरील 10 टक्के तूट आणि इतर खर्च भरून काढण्यासाठी वापरता येईल. तर उरलेले 1000 रुपये शासनाकडे जमा करावे लागणार आहेत.

2025-26 या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच सदर सुधारित शुल्क लागू होणार आहे, असेही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे.

  • पदविका आणि प्रमाणपत्र अशा 12 प्रकारच्या अभ्यासक्रमांच्या शुल्कात 10 हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केली आहे. यामध्ये फाउंडेशन डिप्लोमा, आर्ट टिचर डिप्लोमा, अप्लाईड आर्ट, ड्रॉइंग-पेंटिंग, आर्ट अँड क्राफ्ट अशा विविध विषयांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT