मुंबई : राज्यातील कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसत असून आरोग्याचेही प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा विधानसभेत आला होता. त्यानुसार, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून आठवडाभरात कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
आमदार महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना सोमवारी विधानसभेत मांडली होती. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक नैसर्गिक फुलांची शेती धोक्यात आली असून तब्बल दोन हजार कोटींची फुलांची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. त्याचा थेट फटका राज्यातील शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन त्यावर बंदी घालण्याची मागणी शिंदे यांच्यासह आमदार कैलास पाटील, नाना पटोले, नारायण कुचे यांनी केली होती. त्यावेळी, अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय करण्याचे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले होते.
बुधवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांवरील बंदीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर, मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय करण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकर्यांच्या बाजूने आहे. कृत्रिम फुलांवर बंदी आणण्याचा निर्णय आठवडाभरात जाहीर केला जाईल, असे मंत्री गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले.