Anupama Gunde, a journalist of the daily 'Pudhari', has been announced as the winner of the Sh. M. Paranjape Award from the Konkan region.
मुंबई: पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे गेल्या पाच वर्षांतील (2019 ते 2023) विविध पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दैनिक ‘पुढारी’च्या पत्रकार अनुपमा गुंडे यांना कोकण विभागातून शि. म. परांजपे पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्याचबरोबर संदीप काळे यांना 2019 चा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, ‘नवाकाळ’ दैनिकाच्या ज्येष्ठ पत्रकार रोहिणी खाडिलकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर), तर मंगेश वैशंपायन (2021) यांना अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारीतेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी-राज्यस्तर), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी-राज्यस्तर), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी-राज्यस्तर), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू-राज्यस्तर), यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर), तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क-राज्यस्तर), समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर), स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर), पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) याचबरोबर अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारितेचा पुरस्कार आणि विभाग स्तरावरही विविध पुरस्कार दिले जातात.
गेल्या पाच वर्षांपासून या पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. मंगळवारी राज्य शासनाच्या वतीने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारर्थींमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजन पारकर यांना 2019 चा बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी-राज्यस्तर), तर विभागीय पुरस्कारामध्ये सचिन लुंगसे यांना आचार्य अत्रे पुरस्कार आणि माहिती व जनसंपर्क विभागातील वर्षा आंधळे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) घोषित करण्यात आला आहे.
पुरस्कारर्थींची निवड करण्यासाठी प्रत्येक वर्षी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तसेच महासंचालनालयाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.