मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या अवघे 6 दिवस आधी भोंदू अशोक खरात याने तब्बल 5 मोबाईल हँडसेट बदलले होते. तपास यंत्रणांच्या सर्व्हिलन्सची भीती असल्यानेच खरातने या संशयास्पद हालचाली केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला आहे. असून, पवार यांच्या मृत्यूचा थेट संबंध खरातशी असण्याची दाट शक्यता वर्तवत त्याची कसून चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे दमानिया यांनी मोठा खुलासा केला आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार, खरात याने 21 ते 31 जानेवारी या 10 दिवसांच्या कालावधीत 5 वेळा हँडसेट बदलले.
यात धक्कादायक बाब म्हणजे, 28 जानेवारीला म्हणजेच अजित पवार यांच्या मृत्यूच्या दिवशीच त्याने फोनचा सर्वाधिक वापर केला होता. त्यानंतर 27 ते 31 जानेवारी दरम्यान वापरलेला मुख्य फोन त्याने पुन्हा कधीच वापरला नाही.
31 जानेवारीला नाशिकहून दिल्लीला पोहोचल्यानंतर त्याने विमानतळावरच आपला मोबाईल बदलला, ज्यातील एक हँडसेट तर अवघ्या 19 मिनिटांच्या एकाच कॉलसाठी वापरण्यात आला होता. पोलिसांनी खरातचे हे सर्व हँडसेट जप्त करून तात्काळ फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवावेत, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
तपास सीबीआयकडे सोपवा : आ. रोहित पवार
अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, या प्रकरणी सीआयडीला माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. खरातने महत्त्वाच्या 6 दिवसांत फोन बदलल्याने संशयाचे धुके अधिक गडद झाले असून, गुन्हेगार पुरावे दडपण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने आता वेळ न घालवता या संपूर्ण प्रकरणाचा तपास तातडीने सीबीआय कडे सोपवावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.