मुंबई : मुंबई महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई महानगरपालिकेने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेले शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्त्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी नुकतीच एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केली होती. ही बातमी एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर करत दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ‘आता आणखी एक 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना?’ अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
शताब्दी रुग्णालय पीपीपी तत्त्वानुसार चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्र्स्टची होती. हा ट्रस्ट पद्मसिंह पाटील यांचा असून, ते अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तथा अजित पवारांचे पुतणे राणा जगजीतसिंह पाटील हे या ट्रस्टचा कारभार पाहतात. राणा पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदारही आहेत.
पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन खरेदीचा व्यवहार पार्थ पवारांना थांबवावा लागला. मात्र, या व्यवहारावरून अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले आहेत.