Mumbai Crime Pudhari
मुंबई

Animal Cruelty Case: तरुणाकडून दोन पाळीव श्वानांवर अनैसर्गिक अत्याचार; सीसीटीव्हीत कैद झाले संतापजनक कृत्य

31 वर्षीय केअरटेकरला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अंधेरी पश्चिमेतील आंबोली येथे एक घृणास्पद प्रकार सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला आहे. मालकाच्या दोन पाळीव कुत्र्यांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 31 वर्षीय केअरटेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा दुसऱ्या दिशेला फिरवून संबंधीत व्यक्तीने हा संतापजनक प्रकार केला आहे. श्वानांच्या मालकीणीने लाईव्ह फीड पाहिल्यामुळे हा प्रकार समोर आला.

अंधेरी पश्चिमेतील आंबोली भागातील महिलेकडे गेल्या तीन वर्षांपासून दोन पाळीव श्वान आहेत. त्यांची देखभाल करणारा नेहमीचा व्यक्ती सुट्टीवर गेल्यामुळे त्यांनी रंजन शाह नावाच्या 31 वर्षीय व्यक्तीला काही दिवसांसाठी बदली कामगार नेमला होता. 7 एप्रिल रोजी संबंधित महिला वैयक्तिक कामासाठी नवी दिल्लीला गेल्या. मात्र, घराबाहेर असूनही त्यांचे आपल्या लाडक्या श्वानांकडे लक्ष होते.

मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा महिलेने मोबाईलवर घराचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले, तेव्हा काहीतरी चुकीचे घडत असल्याचा संशय तिला आला. हॉलमधील कॅमेऱ्याची दिशा मुद्दाम बदलण्यात आली होती. श्वानांचे वागणेही नेहमीसारखे नव्हते. त्यांनी वेळ न दवडता तातडीने मुंबईत असलेल्या आपल्या ओळखीच्या व्यक्तींना आणि शेजाऱ्यांना फ्लॅटवर जाण्यास सांगितले.

महिलेचे नातेवाईक आणि शेजारी जेव्हा फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा केअरटेकर रंजन शाह याने आधी विचित्र उत्तरे दिली. ‌‘मी तर फक्त कुत्र्यांशी खेळत होतो,‌’ असे खोटे सांगितले. मात्र, उपस्थितांनी धारेवर धरताच त्याने लहान कुत्र्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची आणि मोठ्या कुत्र्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित श्वानांच्या मालकिणीने दिल्लीहून परतल्यावर आंबोली पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी रंजन शाह याच्यावर प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा विकृतावर कडक कारवाई करण्याची मागणी श्वानप्रेमींकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT