मुंबई ः राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अर्थात स्वीय सहायक अनंत गर्जे याला स्वतःच्या पत्नीस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास स्वतःहून वरळी पोलिसांना शरण आला होता. सोमवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता, 27 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, डॉ. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत पोलिसांनी कसून तपास सुरू केलाआहे.
अनंत गर्जे याच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी वरळीस्थित आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत याचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची बाब गौरी यांच्या निदर्शनास आली होती. याप्रकरणी गौरी यांच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जेसह त्याची बहीण शीतल गर्जे-आंधळे व दीर अजय गर्जे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमासह इतर प्रकरणांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनंत फरारी झाला होता. अखेर त्याने रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास स्वतःहून वरळी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते. घाबरून इमारतीच्या 31 व्या मजल्यावरून खिडकीच्या माध्यमातून मी 30 व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असे गर्जेने म्हटले आहे. गर्जेने गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करत असून, तिला समजावून सांगा, असा फोन केला होता. त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या, असे सांगितले. मात्र, नंतर अनंत म्हणाला, मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. यानंतर लगेचच गर्जेने गौरीच्या आईला फोन करून गौरीने आत्महत्या केल्याचे सांगितले. यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले. गौरीच्या आईने 50 हून अधिक फोन केले. मात्र, गर्जेने एकाही फोनला उत्तर दिले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
गर्जे याने या घटनेविषयी एक निवेदन जारी करून आपण पोलिसांच्या चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे. यात त्याने म्हटले आहे की, कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्यरीतीने पार पडावी, यासाठी मी स्वतःहून पोलिसांपुढे हजर होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास निष्पक्ष व्हावा व सत्य जनतेपुढे यावे, यासाठी मी तपास यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्यास तयार आहे. दरम्यान, पोलिसांचे एक पथक गर्जेच्या वरळीतील घरी रवाना झाले आहे. या पथकात काही डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यामुळे आता गर्जे याच्या घराच्या झाडाझडतीत पोलिसांना कोणता महत्त्वाचा पुरावा सापडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई-वडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. गौरी यांनी गळफास लावून घेतल्यानंतर गर्जे याने तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी त्याला अटक का केली नाही? त्यावेळी त्याला का सोडून देण्यात आले? असे विविध प्रश्न त्यांनी विचारले आहेत.