महानंदा डेअरीत अमोनिया गळती pudhari photo
मुंबई

Ammonia leak at Mahananda Dairy : महानंदा डेअरीत अमोनिया गळती

यंत्रणांच्या तत्परतेमुळे गळती नियंत्रणात; अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा
गोरेगाव : पूनम पाटगावे

गोरेगावच्या पूर्वेला नेस्को मैदानासमोरच असलेल्या महानंद डेअरीमध्ये बुधवारी रात्री अकस्मात अमोनिया वायूची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. ही गळती वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

बुधवारी रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी हा प्रकार घडल्याचे मुंबई महापालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तब्बल 3,000 किलो क्षमतेच्या टाकीतून अमोनिया गळती सुरू झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं. महानंद डेअरीच्या तळमजल्यावरील शीतगृहामध्ये एकाच सिलिंडरमधून ही गळती सुरू झाली आणि सुमारे 500 चौरस फूट क्षेत्रात अमोनिया पसरला.

वायूगळतीची खबर मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक आणि आणि महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या. खासकरून रासायनिक, जैविक आणि घातक वायूंच्या गळतीचे संकट हाताळण्यासाठी प्रशिक्षित असलेल्या हजमॅट पथकाने वेळीच कारवाई केली. गळती सुरू झालेल्या टाकीतला 20 किलो अमोनिया दुसर्‍या टाकीत हलवण्यात आला.

अमोनिया टाकीची झडप बिघडल्यामुळे ही गळती झाल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. ही झडप दुरुस्त करत रासायनिक तंत्राने वायू निष्क्रिय करण्यात आला आणि गळती आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही. सावध पावले उचलत कर्मचार्यांची तात्काळ सुटका करण्यात आली. यंत्रणांनी दाखवलेली तत्परता आणि समन्वयामुळे एक मोठे संकट टळले.

  • अमोनिया वायू हा जितका विषारी तितकाच ज्वलनशील असतो. त्याची गळती झालेल्या परिसरात अत्यंत काळजीपूर्वक काम करावे लागते. गतवर्षी सांगली जिल्ह्यातील एका खताच्या कंपनीत अमोनियाची गळती होऊन तीन जण दगावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT