Amitabh Bachchan Jalsa Bomb Threat: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील ‘जलसा’ या बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाला एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. या ई-मेलमध्ये मुंबई उच्च न्यायालयासह मुंबई शेअर बाजार (BSE), वरळी रेसकोर्स आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकीचा ई-मेल मिळताच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आणि संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचाही तपास केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. आयुष्मान खुराना यांना धमकी दिल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचने बेंगळुरूमधून एका आरोपीला अटक केली होती. विशेष म्हणजे, हा आरोपी व्यवसायाने आयटी इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे, तुषार कपूर यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाचाही पोलिसांनी सखोल तपास केला होता.
दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ला झाल्यापासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना वेगवेगळ्या माध्यमांतून धमक्या मिळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे चित्रपटसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. एकेकाळी बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा असलेला हस्तक्षेप पुन्हा वाढत आहे का? अशा चर्चांनाही यामुळे उधाण आले आहे.
दरम्यान, या धमकीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, धमकीमागील सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.