मुंबई: ऐन गणेशोत्सवात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस आहे. रविवारी जरांगे पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावर मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. आज राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दर्शवत मनसेच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडीयावर पोस्ट करत आवाहन केले आहे.
अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो...सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे.