मुंबई;पुढारी वृत्तसेवा : मुंबईत शनिवारी दिवसभर पावसाची संततधार असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले. नारळाचे तोरण, हार आणि मोदकाचा प्रसाद अर्पण करत शहा यांनी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे प्रार्थना केली.
शनिवारी मुंबई विमानतळावर आगमन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुंबई विमानतळावरून अमित शहा यांनी भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. वांद्रे येथून ते थेट लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. शहा यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी लालबागच्या राजाचे दर्शन काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. दर्शनानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले. तेथे विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी शहा यांना चांदीची गणेशमूर्ती भेट दिली. तेथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही शहा यांनी गणेशाचे दर्शन घेतले.