शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महायुती नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. file photo
मुंबई

Mahayuti Seat Sharing | महायुतीच्या जागावाटपासाठी खलबते !

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जागांवर विशेष चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मंगळवारच्या मुंबई दौऱ्यापूर्वी अधिकाधिक जागांवर सहमती घडविण्यासाठी महायुतीचे नेते मॅरेथॉन बैठका करत आहेत. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. सुमारे साडेचार तास चाललेल्या या बैठकीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित करण्यात आले, तर महायुतीच्या प्रभावी समन्वयासाठी दहा कलमी कार्यक्रमावरही चर्चा झाली. (Mahayuti Seat Sharing)

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान आमदारांच्या जागांसोबतच तिन्ही पक्षांचा दावा असणाऱ्या मतदारसंघांबाबतही यावेळी चर्चा झाली. जिथे एकाहून अधिक पक्षांचा दावा आहे, अशा जागांवर कोणता उमेदवार प्रभावी ठरू शकतो याची चाचपणी करण्यात आली. त्यासाठी उमेदवाराची क्षमता, स्थानिक पातळी वरील जातीय आणि राजकीय समीकरणांचाही ऊहापोह करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबतच, जिंकून येणाऱ्या जागा आणि अधिक मेहनत करावी लागेल अशा मतदारसंघांचाही धांडोळा घेण्यात आला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत या भागात विशेष काळजी घेतली जाणार आहे. या तीन भागांत १७८ जागा आहेत. (Mahayuti Seat Sharing)

प्रचारमोहिमेबाबतही या बैठकीत विचारविनिमय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रचारा दरम्यान कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायला हवा, कोणते वादग्रस्त मुद्दे प्रकर्षाने टाळायला हवेत, याची चर्चा करण्यात आली. महायुतीच्या जाहीरनाम्यात नागरिकांना जवळचे वाटतील तसेच त्यांच्याशी निगडित मुद्द्यांना प्राधान्य देण्यावर बैठकीत सहमती झाली. तसेच, प्रचारसभांच्या नियोजनावर सखोल चर्चा झाल्याचे समजते. (Mahayuti Seat Sharing)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT