Amit Satam Rahul Shewale pudhari photo
मुंबई

Amit Satam Rahul Shewale Delhi Meeting: 'मुंबई'साठी साटम-शेवाळेंची दिल्लीत बैठक; सरवणकरांच्या नाराजीवरही सत्यता तपासणार

महायुतीमधील कोणताही पक्ष किंवा नेता नाराज नाही, कोणाच्याही मनात चिंता नाही," असा दावा साटम यांनी केला आहे.

Anirudha Sankpal

Amit Satam Rahul Shewale Delhi Meeting: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी विविध समित्यांच्या निवडीसंदर्भात महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महायुती म्हणून समित्यांच्या संदर्भात पुढे कसे जायचे, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जागावाटपाचे सूत्र आणि संघटनात्मक ताकद

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित साटम यांनी स्पष्ट केले की, मुंबईतील जागावाटप करताना पब्लिक सेंटीमेंट, संघटनात्मक ताकद आणि कोणत्या ठिकाणी कोणता कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करण्यात आला आहे. "या निर्णयावर महायुतीमधील कोणताही पक्ष किंवा नेता नाराज नाही, कोणाच्याही मनात चिंता नाही," असा दावा साटम यांनी केला आहे.

समाधान सरवणकर नाराजीवर भाष्य

माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्या पराभवानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर साटम म्हणाले की, "समाधान सरवणकर हे अत्यंत कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी काही मुद्द्यांवर चिंता व्यक्त केली आहे, त्यातील सत्यता आम्ही तपासून पाहू. त्यांनी भाजपवर आक्षेप घेतलेला नाही, तर काही व्यक्तींवर निशाणा साधला आहे. अशा गोष्टी मीडियासमोर बोलण्यापेक्षा आपापसात चर्चेने सोडवल्या पाहिजेत."

'नॉट रिचेबल' नगरसेवक

ठाकरे गटाचे नगरसेवक 'नॉट रिचेबल' असल्याच्या प्रश्नावर साटम यांनी टोला लगावला की, "त्यांचे नगरसेवक त्यांना का मिळत नाहीत, याचे उत्तर उद्धव ठाकरेच देऊ शकतील." तसेच, पुण्यातील रूपाली पाटील यांनी निवडणूक हायजॅक केल्याच्या आरोपावर बोलताना साटम म्हणाले की, पराभव पचवण्याची ताकद नसलेले लोक नैराश्यातून असे आरोप करतात, त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे.

कार्यकर्त्यांना समज

भाजपचे जितेंद्र राऊत यांच्या फेसबुक पोस्टवर भाष्य करताना साटम यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. "कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यांच्या चिंता त्यांनी पक्षांतर्गत मांडल्या पाहिजेत. जाहीररीत्या अशी विधाने करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ," असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT