राजकुमार भगत
उरण : उरण तालुक्यातील हिंद कंटेनर टर्मिनल येथे एका टायर कंटेनरमध्ये एक परदेशी जातीचा साप आढळून आला आहे. या सापाची ओळख ‘कॉर्न स्नेक’ अशी झाली असून हा उत्तर अमेरिकन खंडातील एक विदेशी प्रजातीचा साप आहे. हा साप कंटेनरमधून या परिसरात आला आहे. भारतात मात्र हा आढळत नसल्याने या दुर्मीळ पाहुण्याबाबत कुतूहल वाढले आहे.
अमेरिकेतून आयात केलेल्या टायरच्या कंटेनरमध्ये जेएनपीए बंदरातून उरण परिसरात आला होता. कंटेनर तपासणीदरम्यान हा साप कर्मचार्यांच्या नजरेस पडला होता. एक वेगळ्या नारंगी रंगाचा, आकर्षक पट्टेरी साप दिसल्याने व्यवस्थापनातर्फे त्वरित बचाव कार्यासाठी फ्रेंडस् ऑफ नेचर फॉन संस्थेच्या स्वप्नील म्हात्रे या स्वयंसेवकास या बाबत माहिती दिली. या नंतर फ्रेंडस् ऑफ नेचर (फॉन) च्या जयेश गायकवाड या बचावकर्त्याने घटनास्थळी जाऊन साप सुरक्षितरीत्या पकडून त्याची काळजी घेतली. पुढील कारवाईसाठी वनविभागाकडे हा साप सुपूर्द करण्यात येणार आहे. त्याला पुन्हा अमेरिकेत पाठविण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
मूळ अधिवास
कॉर्न साप हे पूर्व अमेरिकेत दक्षिण न्यू जर्सीपासून फ्लोरिडा, लुईझियाना आणि केंटकीच्या काही भागात आढळतात. फ्लोरिडा आणि इतर आग्नेय राज्यांमध्ये ते सर्वाधिक आढळतात. कॅरेबियनमधील अनेक बेटांवर ओळखल्या जाणार्या सापांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये बहामास (न्यू प्रोव्हिडन्स आणि ग्रँड बहामा), ग्रँड केमन, यूएस व्हर्जिन आयलंड (सेंट थॉमस) येथे त्याचा मूळ अधिवास.
मण्यारसारखा निशाचर, मात्र बिनविषारी
हा साप मण्यारसारखाच निशाचर, मात्र बिनविषारी आहे. मध्यरात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी अधिक सक्रिय असतो. दिवसाचा बहुतेक वेळ लाकडाखाली, प्राण्यांच्या बिळांमध्ये किंवा इतर लपण्याच्या ठिकाणी घालवतात. ते उंदीर, घुशी, लहान पक्षी, त्यांची अंडी आणि सरडे यांसारखे लहान भक्ष्य खातात. ते भक्ष्याला पकडण्यासाठी आणि मारण्यासाठी आकुंचन पद्धतीचा वापर करतात.
पाळीव प्राणी म्हणून लोकप्रिय
‘कॉर्न स्नेक’ हे साप दिसायला विषारी ‘कॉपरहेड’ सापासारखे दिसतात. यामुळे लोक अनेकदा त्यांना चुकून मारतात. त्यांचा शांत स्वभाव आणि सांभाळण्यास सोपे असल्यामुळे ते पाळीव प्राणी म्हणून जगभरात खूप लोकप्रिय आहेत. जंगलात त्यांचे आयुष्य साधारणपणे 6-8 वर्षे असते; परंतु पाळीव प्राणी म्हणून ते 20 वर्षांहून अधिक काळ जगू शकतात.
अत्यंत लाजाळू बिनविषारी साप
हा साप बिनविषारी असून यापासून मानवाला कोणताही धोका नसतो. या जातीचे साप प्रामुख्याने पाळीव स्वरूपात ठेवले जातात. हे साप जंगली झुडुपे, खडकाळ टेकड्या, कुरण, जंगले, खडकाळ खुले क्षेत्र, कोठारे आणि पडीक इमारतींमध्ये राहतात. तथापि भारतात अशा परदेशी प्रजातींची उपस्थिती पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जाते. कारण ते इथल्या स्थानिक प्रजातींसाठी प्रतिकूल ठरू शकतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे जेथून आलेत तिथे पाठविणेच योग्य असते.