सर्व लोकल लवकरच होणार वातानुकूलित pudhari photo
मुंबई

AC local trains Mumbai : सर्व लोकल लवकरच होणार वातानुकूलित

मुख्यमंत्री फडणवीस यांची आनंदवार्ता; रेल्वे मंत्री मुंबईत येऊन करणार घोषणा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : लोकलमधून पडून प्रवाशांचे होणारे अपघात पाहता लोकलचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी उपनगरीय रेल्वेला बंद दरवाजांचे डबे लावण्यात येणार असून ही सेवा संपूर्णपणे वातानुकूलित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी जाहीर केले.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव लवकरच मुंबईत येऊन एसी लोकल गाड्यांची अधिकृत घोषणा करतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

लोकल गाड्यांना बंद होणारे दरवाजे नसल्याने दुर्घटना होतात. मेट्रो जशी पूर्णपणे वातानुकूलित असते आणि तिचे दरवाजे बंद होतात, तसे नवे डबे मुंबईकरांच्या उपनगरीय लोकलला असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांकडे आपण केली आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे रेल्वेमंत्र्यांनी मान्य केले आहे. लवकरच मुंबईत येऊन ते यासंदर्भातील अधिकृत घोषणा करतील. मुंबई लोकलचे सर्व डबे एसी होणार असले तरी लोकलच्या आजच्या तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबई लोकलचे सर्व डबे एसी करताना कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्याच जून महिन्यात जाहीर केले होते. 10 जून रोजी ’सेवा आणि सुशासनाचे अकरा वर्षे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुंब्रा लोकल दुर्घटनेची दखल घेत फडणवीस यांनी सांगितले होते की, मुंब्रा दुर्घटनेनंतर माध्यमांनी रेल्वेमंत्र्यांवर असंवेदनशीलतेचा आरोप केला. मात्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाऊण तास चर्चा करून लोकलच्या प्रवासातील समस्या आणि उपाययोजना सांगितल्या.

मुंबईकरांना एसी लोकल देण्याचा आणि तेही भाडे वाढ न करता देण्याचा एक मास्टर प्लॅन सरकारकडे असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्या पाठोपाठ मुंबईसाठी 238 नव्या एसी लोकल गाड्या मंजूर करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. आता सरसकट सर्वच लोकल वातानुकूलित होणार असल्याची आनंदवार्ता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या मुंबई भेटीकडे आता मुंबईकरांचे लक्ष असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT