अजित पवार आणि शरद पवार  file photo
मुंबई

Maharashtra politics | जागावाटपात अजित पवार गटापेक्षा शरद पवार गट राहणार फायद्यात

विधानसभेसाठी जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू

पुढारी वृत्तसेवा
प्रमोद चुंचूवार

मुंबई ः महाविकास आणि महायुतीतीत आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावरील जागा निर्णायक ठरणार आहेत. या जागांचा विचार केला, तर महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अधिक फायद्यात राहणार असल्याचे चित्र आहे.

2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 127 जागा लढवल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीने जिंकलेल्या 54 जागा आणि दुसर्‍या क्रमांकाच्या 47 जागा अशा 91 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा असून या संख्येच्या जवळपास जागा त्यांना महाविकास आघाडीत मिळतील, अशी शक्यता आहे. 2019 ला जिंकलेल्या जागांवर संबंधित घटक पक्षाचाच दावा राहील, असा धोरणात्मक निर्णय महाविकास आघाडीत घेण्यात आला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या. यापैकी 40 हून आमदार भलेही अजित पवारांसोबत गेले असले तरी 2019 ला जिंकलेल्या जागा या न्यायाने या 54 जागा पवारांना मिळतील.

2019 च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षनिहाय लढतींचा अभ्यास केल्यावर असे दिसते की, राष्ट्रवादीने भाजपविरोधात एकूण 57 जागांवर थेट लढत दिली. यापैकी भाजपने 33 तर राष्ट्रवादीने 23 जागा जिंकल्या. यापैकी 30 जागांवर राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर होती. यासोबतच राष्ट्रवादीने शिवसेनेविरोधात 59 जागांवर थेट लढत दिली. यापैकी 27 जागा शिवसेनेने तर राष्ट्रवादीने 28 जागा जिंकल्या. शिवसेनेविरोधातील लढाईत 17 जागांवर राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर होती, अशी माहिती राजकीय विश्लेषक अ‍ॅड. विजयकुमार कोहाड यांनी दिली.

शरद पवार गटाला बोनस

2019 मध्ये भाजपने जिंकलेल्या 33 जागांपैकी 30 जागांवर राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर होती. अजित पवार गट आता महायुतीत गेल्याने या 30 जागांवर ते दावा सांगू शकत नाहीत. या उलट शरद पवार गट भाजपसोबत नसल्याने या 30 जागांवर त्यांचा दावा असणार आहे. शिवसेनेने जिंकलेल्या 27 जागांपैकी 17 जागांवर राष्ट्रवादीने दुसर्‍या क्रमांकाची मते प्राप्त केली आहेत. मात्र शिवसेनेचे दोन गट महाविकास व महायुतीत दोन्हीकडे असल्याने दोन्ही राष्ट्रवादीला दुसर्‍या क्रमांकावरील या

जागांवर दावा करता येणार नाही!

लोकसभेच्या 2024 च्या निकालाचे विधानसभा मतदार संघनिहाय विश्लेषण, चारही पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने 2014 च्या विधानसभेचा निकाल हे घटक लक्षात घेतले तर या 30 पैकी किमान 12 जागांवर राष्ट्रवादी (शरद पवार) च्या विजयाची दाट शक्यता दिसते, असे अ‍ॅड. कोहाड यांनी सांगितले.

काँग्रेसचा 53 जागांवर दावा

काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत 147 जागा लढविल्या होत्या. यापैकी 44 जागांवर त्यांना विजय मिळाला तर 69 जागांवर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर होती. काँग्रेसने भाजपविरोधात 94 जागांवर थेट लढत दिली होती. त्यापैकी 63 जागांवर भाजप तर काँग्रेस 23 जागांवर विजयी झाली होती. भाजपने जिंकलेल्या 63 पैकी 53 जागांवर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर होती त्यामुळे जिंकलेल्या 44 (नंतर पोटनिवडणुकीत जिंकलेली कसबा पकडून 45) आणि भाजपविरोधातील दुसर्‍या क्रमांकावरील 53 अशा 97 जागांवर काँग्रेसचा भक्कम दावा आहे. शिवसेनेविरोधात काँग्रेसने 51 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेने 26 तर काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने जिंकलेल्या जागांपैकी 13 जागांवर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर आहे. अर्थात, शिवसेना (ठाकरे) गट सोबत असल्याने या 13 जागांवर काँग्रेसलाही दावा करणे जवळपास अशक्यच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT