मुंबई

Sanjay Raut |अजित पवारांचा विमान अपघात 'ऑपरेशन लोटस'चा भाग : संजय राऊतांचा गंभीर आरोप

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सुरक्षा वाढविण्‍याचीही केली मागणी

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Ajit Pawar’s plane accident

नवी दिल्ली : "सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केले म्हणून महाराष्ट्र विमान अपघात विसरणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांच्या नसबंदीत भाजपने पैसे खाल्ले, हे अजितदादांनी समोर आणले होते. त्यांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते. ते स्वगृही येण्याच्या तयारीत होते," असा दावा करत अजित पवारांचा विमान अपघात 'ऑपरेशन लोटस'चा भाग आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ने नव्हे, तर न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

विमान अपघातामागील गूढ जाणून घेण्याचा जनतेला अधिकार

अजित पवार यांच्या अपघाती रहस्यमय मृत्यूचे गूढ जाणून घेण्याचा अधिकार राज्याच्या जनतेला आहे. अपघाताबाबत अजित पवार यांच्या काही आमदारांनी आणि नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. "भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स माझ्याकडे आहेत," असे अजित पवार म्हणाले होते. त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांच्याकडे बरीच कागदपत्रे तयार झाली होती, ज्यामुळे भाजप अस्वस्थ होती. असा आरोप करत अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताचा विषय संसदेत रेकॉर्डवर आणावा असे मला वाटले, म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला. न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे.

DGCA कडून चौकशी होणार नाही

विमान अपघाताची नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)कडून चौकशी होणार नाही. विमान अपघाताच्या चौकशीसाठी कालमर्यादा घालून द्यावी. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केले म्हणजे राज्य हा विषय विसरले असे नाही. यावर पंतप्रधान, अमित शाह, नागरी विमान वाहतूक मंत्री यांनी बोलायला हवे, असेही राऊत म्हणाले.

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सुरक्षा वाढवावी

माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या आत्मचरित्रातील काही मुद्द्यांच्या आधारावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले; त्यांनी नरवणे यांच्या पुस्तकाची चिरफाड केली. पण संसदेत त्यांना बोलू दिले नाही. त्यांचा विषय राष्ट्रहिताचा होता. मनोज नरवणे यांनी सगळे प्रकरण पुस्तकात लिहिले आहे. ते देशासमोर मांडण्यासाठी काही हरकत नव्हती. संसद बंद करून नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांनी पळ काढला. आता मनोज नरवणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे गरजेचे आहे. मनोज नरवणे यांची सुरक्षा वाढवली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊतांनी केली.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला मोदी, शहा आणि फडणवीसांचा अडथळा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन गटांनी एकत्र यावे, अशी अजित पवार यांची इच्छा होती; पण मोदी, शाह, फडणवीस यांचा त्याला अडथळा आहे. भाजपला विरोध करणारा एक तर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो, असा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT