मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्लीवार्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर काका - पुतण्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये या दोन नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या आहेत. तसेच दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. मात्र, ही भेट राजकीय नव्हती, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, शरद पवार हे आमच्या माळेगावमधील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष हे या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले जातात. माळेगाव साखर कारखान्याचा मी अध्यक्ष असल्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली.
शिक्षण संस्थेवर
विश्वस्त मंडळ नेमायची जबाबदारी अध्यक्षांची असते. आमचे 6 गट आहेत, त्या सहा गटातील एक -एक प्रतिनिधी घ्यायचा असतो. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ ठरवायची होती, त्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले.