मुंबई

Maharashtra Olympic Association : ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्‍या पॅनेलची घोषणा

मंत्री मुरलीधर मोहोळ समर्थक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता

रणजित गायकवाड

मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्‍या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या ऑलिम्‍पिक पॅनेलचे पारडे जड असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. येत्‍या रविवारी होणाऱ्या एमओएच्‍या निवडणुकीत अजित पवार गटाचे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्‍यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अजित पवार यांच्यासमोर सध्या कुठलेही पॅनल अद्याप घोषित झालेले नाही, हे विशेष ! मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांच्या माध्यमातून काही उमेदवार दिले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

मुंबईत २ नोव्‍हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्‍पिक पॅनलची घोषणा अर्जुन पदक विजेते अशोक पंडित आणि ध्यानचंद पदक विजेते प्रदीप गंधे यांनी केली आहे. 30 मतदार संघटनांपैकी 22 पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे....

अध्यक्ष – अजित पवार,

वरिष्ठ उपाध्यक्ष – अशोक पंडित,

उपाध्यक्ष – आदिल सुमारीवाला- बिनविरोध निवड

उपाध्यक्ष – प्रदिप गंधे, बिनविरोध निवड

उपाध्यक्ष – प्रशांत देशपांडे, बिनविरोध निवड

उपाध्यक्ष - दयानंद कुमार , बिनशर्त पाठिंबा

सचिव – नामदेव शिरगांवकर

सहसचिव – निलेश जगताप

सहसचिव – उदय डोंगरे

सहसचिव – मनोज भोरे

सहसचिव – चंद्रजीत जाधव

खजिनदार – स्‍मिता शिरोळे

कार्यकारिणी सदस्य – संदिप चौधरी

कार्यकारिणी सदस्य – संदिप ओंबासे

कार्यकारिणी सदस्य – राजेंद्र निम्‍बाते

कार्यकारिणी सदस्य – गिरीश फडणीस

कार्यकारिणी सदस्य – रणधीरसिंग

कार्यकारिणी सदस्य – किरण चौगुले

कार्यकारिणी सदस्य – समीर मुणगेकर

कार्यकारिणी सदस्य – संजय वळवी

कार्यकारिणी सदस्य – सोपान कटके

बहुमत असल्‍याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या गटाचा विजय निश्चित दिसत आहे. यापूर्वीच उपाध्यक्ष पदासाठी आदिल सुमारीवाला, प्रदिप गंधे व प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विजयी उमेदवार आंतराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदिप गंधे म्‍हणाले, की गेल्‍या पाच वर्षांत महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेत देशात अव्‍वल स्‍थान पटकावले आहे. याचे श्रेय क्रीडा क्षेत्राला सर्वतोपरी मदत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री, क्रीडा प्रशासन यांना देखील आहे.

पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेने राज्यातील सर्व क्रीडा संघटनांना सोबत घेऊन काम केले आहे. राज्यातील खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेऊन मागील तीन वर्षांमध्ये तीनही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हे यश राज्यातील सर्व क्रीडा संघटना आणि खेळाडूंच्या प्रयत्नांचेच आहे. अजित पवार यांच्‍या कार्यकुशल नेतृत्‍वामुळे एमओएच्‍या संकल्‍पनेतून राज्यात महाराष्ट्र ऑलिम्‍पिक भवनासह देशातील पहिले क्रीडा संग्रहालय साकार होत आहे. यामुळेच निवडणुकीत बहुसंख्य संघटनांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. खेळामध्ये कुठलेही राजकारण न आणता क्रीडा क्षेत्रासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा अजित पवार गटाचा मानस आहे.

ही निवडणूक अराजकीय -अजित पवार

महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेतील 22 पेक्षा अधिक संघटनांनी पुण्यातील बैठकीत उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. यावेळी पवार म्‍हणाले की, " ही कुठलीही राजकीय निवडणूक नाही. त्यामुळे मी स्वतःही कोणतेही राजकीय विधान केलेले नाही.कोणी राजकीय रंग देत असतील तर ती महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT