मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार हे अडीच वर्षे माझ्या बरोबर होते. मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. इतरांकडून सत्तेचे डावपेच सुरू असले तरीही अजित पवारांकडून जनतेला निश्चित मदत मिळेल. कारण आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आल्या आहेत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. पावसाळी अधिवेशनासाठी यंदा प्रथमच विधिमंडळात हजर झालेल्या ठाकरेंनी अजित पवारांची भेट त्यांचे कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उद्धव ठाकरे हे बुधवारी जवळपास पाऊण तास विधान परिषद कामकाजात सहभागी झाले. त्यानंतर आपल्या आमदारांसह विधिमंडळातील अजित पवारांच्या दालनात गेले. तिथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. यानिमित्ताने ठाकरे यांनी प्रथमच शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्याची भेट घेतली. यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या जी सत्तेची साठमारी चालली आहे त्यात राज्यातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. पाऊस सुरू झाला आहे, पूरस्थिती आहे. आधी पाऊस नसल्याने आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल होईल. त्यामुळे शेतकरी, नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, अजित पवार हे शरद पवारांना दोन दिवस का भेटले, असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता त्यावर आमची काहीही चर्चा झाली नसल्याचे ठाकरेंनी सांगितले. दरम्यान, बेंगळूरमधील विरोधकांच्या आघाडीविषयी ठाकरे म्हणाले, ही आघाडी एका पक्षाविरोधात किंवा व्यक्तीविरोधात नाही; तर हुकूमशाहीविरोधात आहे.
विधान परिषद सभागृहात उद्धव ठाकरे आले तेव्हा उपसभापती नीलम गोर्हे या पीठासीन होत्या. ठाकरे सभागृहात आल्यानंतर गोर्हे यांनी त्यांना नमस्कार केला. त्यानंतर थोड्या वेळातच उपसभापती गोर्हे यांनी मार्शलमार्फत त्यांच्याकडे चिठ्ठी पाठवली. उद्धव ठाकरे यांनी ती चिठ्ठी घेतली, पण उघडून पाहिली नाही. मात्र, जाताना ते सोबत ती चिठ्ठी घेऊन गेले. त्यामुळे नेमके या चिठ्ठीत काय लिहिले होते आणि ते त्यांनी वाचले का, याची कुजबूज विधिमंडळात सुरू होती.