Ajit Pawar
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेबाबत अर्थमंत्री अजित पवारांनी मोठा खुलासा केला आहे. File Photo
मुंबई

'लाडकी बहिण' याेजनेला अर्थ खात्‍याचा विरोध? अजित पवारांनी केला मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना बहुचर्चित ठरली आहे. या योजनेच्‍या माध्‍यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. दरम्‍यान, या योजनेला अर्थ खात्याने तीव्र विरोध केल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आता याबाबत राज्‍याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) याबाबत मोठा खुलासा केला आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेबाबत अजित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्‍ट केली आहे. या पोस्‍टमध्‍ये त्‍यांनी म्‍हटलं आहे की, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.

चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये स्‍पष्‍ट केले आहे.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या विसंगत आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूय, असे आवाहनही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टच्‍या माध्‍यमातून केले आहे.

SCROLL FOR NEXT