Sharad Pawar Emotional Reaction On Ajit Pawar Death
पुणे : "अजित पवार यांच्या अपघातामागे काही राजकारण असल्याच्या भूमिका मांडल्या जात आहेत. पण यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात असून या मृत्यू यातन्या महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया यात राजकारण आणू नये, एवढंच सांगायचं आहे", अशी कळकळीची विनंती शरद पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर शरद पवार यांनी व्हिडिओ जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, 'अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
'मी आज मीडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कोलकोत्यावरुन मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत', असंही शरद पवारांनी म्हटलंय.
ममता बॅनर्जींनी काय म्हटले होते?
अजित पवार यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. या अपघाताच्या घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियावर व्यक्त होत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे, या घटनेमुळे मला अतीव दुःख झाले आहे. अजित पवारांचे काका शरद पवार यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि दिवंगत अजित पवारांचे सर्व मित्र, चाहते, समर्थक यांच्याप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते. या घटनेची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे.
तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी अखिलेश यादव यांनी केली. यातील खरे कारण समोर आले पाहिजे, असेही अखिलेश यादव म्हणाले. आपच्या प्रवक्त्यांनीही अशीच मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर
'ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दुर्दैवाने राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे की एखाद्याच्या मृत्यूवरुनही राजकारण केलं जातंय. ममता बॅनर्जींनी इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरू केल्याचं बघून मला वाईट वाटतंय. त्यांनी अशा स्वरुपाचे विधान टाळायला हवे होते', असे फडणवीसांनी म्हटले आहे.
दु:खावर फुंकर घालण्याचे काम करा- शिंदे
ममता बॅनर्जींच्या विधानावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनेही टीका केली आहे. 'ही राजकारण करण्याची वेळ नाही. उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र शोक सागरात असून अजित पवारांच्या कुटुंबियांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम केले पाहिजे', असे एकनाथ शिंदेंनी सुनावले आहे.