देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार File Photo
मुंबई

देवेंद्र फडणवीसांनीच मुख्‍यमंत्री व्‍हावे : अजित पवारांची 'आग्रही' मागणी

राष्‍ट्रवादीच्‍या नवनिर्वाचित आमदारांच्‍या बैठकीत चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. महायुतीला २८८ पैकी तब्‍बल २३४ जागांवर विजय मिळाला असून, आता मुख्‍यमंत्रीपदी कोणाची निवड होणार, यावर राजकीय वर्तुळात खल सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्‍याकडेच मुख्‍यमंत्रीपद कायम ठेवावे, अशी चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्‍यमंत्रीपदी निवड व्‍हावी, अशी आग्रही मागणी अजित पवारांनी केली असल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

राष्‍ट्रवादीच्‍या नवनिर्वाचित आमदारांच्‍या बैठकीत चर्चा

अजित पवार यांनी रविवारी (दि.२४) राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. यावेळी राज्‍यातील भावी मुख्‍यंत्रीपदी कोणाची निवड व्‍हावी, यावर चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री असावेत, अशी आग्रही मागणी स्‍वत: अजित पवारांनीच केल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

शिंदे-पवार संघर्षाचे कारण काय?

राज्‍यात २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, तत्‍कालीन राष्‍ट्रवादी आणि काँग्रेस सरकार स्‍थापन झाले. मात्र २०२२ मध्‍ये शिवसेनेत फूट फडली. अजित पवार यांना राज्याच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण अधिकार देण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयही या फूटीला कारणीभूत होता. कारण अजित पवारांना दिलेला अधिकारामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाले, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र काही दिवसांनी राष्‍ट्रवादीतही फूट पडली. भाजपने अजित पवारांना महायुतीमध्‍ये घेतल्‍याने त्‍यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा होती.

भाजप पक्षश्रेष्‍ठी घेणार निर्णय

महाराष्‍ट्राचा मुख्‍यमंत्री कोण होणार, या प्रश्‍नावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजप पक्षश्रेष्‍ठींच्‍या संयुक्त बैठकीनंतरच घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२, शिवसेना ( शिंदे गट) ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. आता संपूर्ण राज्‍याचे लक्ष भाजप महायुक्‍तीच्‍या संयुक्‍त बैठकीत कोणता निर्णय होणार, याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष वेधले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT